आपण घर कितीही स्वच्छ ठेवायचं ठरवलं तरी काही ना काही कारणाने ते खराब होतंच. यातही स्वयंपाकघर आणि टॉयलेट-बाथरुम यांचा वापर जास्त असल्याने ते जास्त खराब होतं. रोजच्या धावपळीत आपण शक्य तितकी साफसफाई करतो. विकेंडला आपण साफसफाईसाठी वेगळा वेळ राखून ठेवतो आणि बारकाईने साफसफाई करतो. याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र घर जास्त घाण होत जातं आणि मग ते साफ करणं अवघड होऊन बसतं. किचन आणि टॉयलेट, बाथरुमच्या टाईल्स हा साफसफाईमधील एक महत्त्वाचा भाग. याठिकाणच्या टाईल्स साधारणपणे पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या असतात.
किचनमध्ये रोज स्वयंपाक करताना पदार्थांच्या वाफेमुळे, पाणी, तेलाची फोडणी किंवा आणखी काही उडाल्याने टाईल्स चिकट होतात. वेळच्या वेळी हा चिकटपणा साफ केला नाही तर नंतर हा राप वाढत जातो आणि साफ करणे अवघड होऊन बसते. याचप्रमाणे टॉयलेट आणि बाथरुममधल्या टाईल्सवरही काही काळाने राप चढतो. आंघोळ करताना बाथरुम स्वच्छ असेल तर चांगलं वाटतं नाहीतर किळस येते. टाईल्सवर चढलेला हा राप आपण बरेचदा साफ करायचा प्रयत्न करतो पण ते डाग जास्त मेंचट असतील तर ते निघत नाहीत. अशावेळी बाजारातले महागडे डिटर्जंट वापरण्यापेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास टाईल्स स्वच्छ होण्यास मदत होते. यामुळे टाईल्स चकाचक दिसतात आणि आपल्याला स्वच्छ वाटतं (How To Clean Tiles Easily).
१. एका बाऊलमध्ये २ चमचे बेकींग सोडा आणि २ चमचे वॉशिंग पावडर घ्यायची.
२. यामध्ये साधारण २ छोटी झाकणं व्हिनेगर घालायचे. व्हिनेगर घातल्यानंतर या सोडा आणि पावडरचा फेस व्हायला सुरुवात होते.
३. मग यामध्ये एखादा लिक्विड डिटर्जंट घालायचा. यानंतर हा फेस वाढत वाढत जातो.
४. फेस झालेले मिश्रण टाईल्सवर टाकून ५ मिनीटे ठेवायचे.
५. एका स्क्रबरवर हे मिश्रण घालून त्याने टाईल्स स्वच्छ घासायची.
६. अगदी कमीत कमी कष्टामध्ये टाईल्स चकचकीत व्हायला मदत होते.
७. मग एका ओल्या कापडाने टाईल्स पुसून घ्यायच्या.