आपण घरात असलो तर बहुतांशवेळा ग्लासने पाणी पितो. पण ऑफीसला किंवा बाहेर जाताना आवर्जून पाण्याची बाटली सोबत ठेवतो. एरवी नाही तरी उन्हाळ्याच्या दिवसांत तर आपण आवर्जून सोबत बाटली ठेवतोच. सतत लागणारी तहान शमवण्यासाठी सोबत पाण्याची बाटली असलेली केव्हाही चांगली. यातही बहुतांश जण प्लास्टीकच्या बाटल्यांचा वापर करताना दिसतात. बाजारात सध्या विविध प्रकारच्या बाटल्या उपलब्ध असतात. यामध्ये अगदी सिंगल यूजपासून ते चांगल्या दर्जाच्या महागड्या बाटल्याही मिळतात. पण पाण्यासाठी वापरत असलेली ही बाटली अनेकदा आपण घाईत नुसती विसळतो आणि पुन्हा त्यात पाणी भरतो. असे केल्याने बाटलीच्या तोंडीशी कधी काळपट तर कधी पिवळट थर जमा होतात (How To Clean Water Bottles at Home).
बाटलीला घाण राहीली आणि पाण्यावाटे ती आपल्या पोटात गेली तर आरोग्याच्यादृष्टीनेही ते चांगले नसते. बाटली निमुळती असल्याने आपला हातही त्यात जाऊ शकत नाही. मग आतूल्या बाजुनेही एकप्रकारचा थर जमा होतो. अशावेळी आ बाटल्या साफ कशा करायचा असा एक प्रश्न अनेकांपुढे असतो. हल्ली बाजारात त्यासाठी वेगळे ब्रशही मिळतात पण आपल्याकडे ते ब्रश नसतील आणि घरच्या घरी आपल्याला सोप्या पद्धतीने बाटली साफ करायची असेल तर त्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आज आपण पाहणार आहोत. यामुळे अगदी ५ ते १० मिनीटांत बाटली साफ व्हायला मदत होईल आणि आपले आरोग्यही चांगले राहील.
१. तांदूळ, व्हिम आणि सोडा
बाटलीमध्ये १ चमचा तांदूळ, अर्धा चमचा व्हिम आणि अर्धा चमचा सोडा घालून त्यामध्ये पाणी घालून ठेवायचे. काही वेळाने ही बाटली जोरजोरात हलवून हे मिश्रण बाटलीला आतल्या बाजुने सगळीकडे लागेल असे पाहायचे. त्यानंतर हे मिश्रण बाहेर काढून बाटली पाण्याने पुन्हा ३ ते ४ वेळा धुवायची. खराब झालेल्या टूथब्रशने बाटलीचा वरचा भाग साफ करायचा.
२. मीठ, लिंबू आणि बर्फ
मीठ, लिंबू आणि बर्फाच्या मदतीनेही आपण पाण्याची बाटली स्वच्छ करु शकतो. यासाठी पाण्याच्या बाटलीत १ कप पाणी आणि नंतर लिंबाचा रस आणि मीठ घाला. आता पाण्याच्या बाटलीत बर्फही घाला. यानंतर बाटली हलवा आणि काही वेळ तशीच राहू द्या. यामुळे बाटलीचे निर्जंतुकीकरण होईल आणि पाण्याची बाटली स्वच्छ होण्यास मदत होईल.
३. बेकींग सोडा आणि कोमट पाणी
बाटलीमध्ये दोन चमचे बेकिंग सोडा घाला, त्यानंतर कोमट पाण्याने बाटली भरा. आता बाटलीचे झाकण लावून ती हलवा. यानंतर झाकण काढा आणि काही तास असेच राहू द्या. काही वेळानंतर बाटली रीकामी करा आणि स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे बाटलीला आतून वास येत असेल तर तो निघून जाण्यास मदत होईल.