फॉर्मल शूजमध्ये, स्पोर्ट शूजमध्ये आपण सगळेच सॉक्स घालतो. अनेक जण पाय खराब होऊ नयेत, थंडी वाजू नये किंवा उन्हाने पाय भाजून निघू नयेत म्हणूनही नियमितपणे सॉक्स वापरतात. वेगवेगळ्या रंगाचे सॉक्स आता बाजारात मिळत असले तरी पांढऱ्या रंगाचे सॉक्स हे जास्त फॉर्मल आणि प्रोफेशनल लूक देणारे असतात हे नक्की. दिवसातील ८ ते १० तास पायांत सॉक्स असल्यावर ते मळणे साहजिकच आहे. अनेकदा घामाने, धुळीने सॉक्स इतके काळे होतात की त्यावरचे डाग निघता निघत नाहीत (How To Clean White Socks). मग कितीही साबण लावला आणि घासले तरी या सॉक्सचा काळेपणा काही कमी होत नाही. अनेकदा डाग निघावेत म्हणून सॉक्स बराच वेळ भिजवून ठेवले जातात, ब्रशने जोरजोरात घासले जातात. मात्र काही केल्या ते म्हणावे तितके पांढरे शुभ्र होत नाहीत. मग असेच मळकट सॉक्स घालून जाणे किंवा ते काळे झालेले सॉक्स फेकून देऊन नवीन सॉक्स आणणे असे दोन पर्याय आपल्यासमोर राहतात. पण या सॉक्सचे काळे डाग निघण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया.
१. बेकींग सोडा
एका मगात पाणी घेऊन त्यामध्ये २ चमचे बेकींग सोडा घालावा. आता यामध्ये काळे डाग पडलेले मोजे २ तासांसाठी भिजवून ठेवा. २ तासांनी मोजे बाहेर काढून ते स्वच्छ घासा. पुन्हा एकदा कपड्याच्या पावडरमध्ये बेकींग सोडा आणि विनेगर घालून भिजवा. यानंतर मोजे बाहेर काढून खळबळा आणि पिळून वाळत घाला. यामुळे मोजे पांढरेशुभ्र तर होतीलच पण त्याचे कापडही सॉफ्ट होण्यास मदत होईल.
२. लिंबू आणि भांड्याचा साबण
एका भांड्यात ३ ते ४ ग्लास पाणी गरम करा. त्यामध्ये २ लिंबांचा रस आणि भांड्यांचा साबणही मिसळा. या मिश्रणात सॉक्स घालून ते १५ मिनीटांसाठी गॅसवर उकळू द्या. उकळल्यामुळे मोज्यातील घाण बाहेर येण्यास मदत होईल आणि ते पांढरे शुभ्र होतील.
३. व्हाईट व्हिनेगर
एका भांड्यात दोन कप पाणी घालून ते उकळा. आता यामध्ये व्हाईट व्हिनेगर आणि खराब झालेले सॉक्स घाला. सॉक्स रात्रभर या पाण्यात तसेच भिजत ठेवा. सकाळी सॉक्स नेहमीप्रमाणे घासून धुवा.
४. हायड्रोजन पॅरॉक्साईड
पांढऱ्या मोज्यांना साफ करण्यासाठी हा एक अतिशय उत्तम उपाय आहे. गरम पाण्यात हायड्रोजन पॅरॉक्साईड घालून आपले मोजे यामध्ये घाला. १ तास तसेच भिजवून ब्लीच डिसपेन्सरमध्ये अर्धा कप पॅरॉक्साईड घाला. त्यानंतर मोजे नेहमीप्रमाणे धुवा. मोज्यांवर असलेले सगळे काळे डाग निघून जाण्यास याचा अतिशय चांगला उपयोग होईल.
५. अमोनिया
अमोनिया एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळे कपड्यांवरची डाग तर जातातच पण पांढरे कपडे चमकदार दिसण्यासाठी त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. सुती, पॉलिस्टर आणि नायलॉन अशा सगळ्या प्रकारच्या कपड्यांसाठी अमोनिया अतिशय फायदेशीर ठरतो. २ चमचे भांड्याचा साबण, २ चमचे अमोनिया आणि २ चमचे बेकींग सोडा २ कप गरम पाण्यात घालावा. त्यात अर्धा तास काळे झालेले सॉक्स भिजवून ठेवावेत. त्यानंतर सॉक्स नेहमीप्रमाणे धुवावेत.