हल्ली घरोघरी लोखंडी, पितळ्याची, तांब्याची इंतकंच काय अगदी मातीची आणि लाकडाचीही भांडी वापरली जातात. पारंपरिक गोष्टींना गेल्या काही वर्षात पुन्हा महत्त्व आले असून त्याचा वापर वाढल्याचे दिसते. काहीच नाही तर पोळपाट-लाटणे, डोसा किंवा धिरडी काढायचं उलथनं, एखादा डाव किंवा चमचा, चॉपिंग बोर्ड यांसारख्या गोष्टी तरी आवर्जून लाकडाच्या वापरल्या जातात. आता आपण जुने ते सोने म्हणत त्याचा वापर करत असलो तरी त्याचा मेंटेनन्स करणे म्हणावे तितके सोपे नसते. लाकडी भांडी वापरल्यानंतर त्याला बुरशी किंवा वास येण्याची शक्यता असते. अनेकदा या गोष्टींवर सततच्या ओलाव्यामुळे एकप्रकारचा काळपट थर जमा होतो. हा थर काढण्यासाठी आपण डीश वॉशर किंवा साबणाने ही भांडी बराच वेळ घासत राहतो किंवा भिजवून ठेवतो. मात्र त्यामुळे हे लाकूड फुगण्याची किंवा खराब होण्याचीच शक्यता जास्त असते (How to clean wooden utensils in Kitchen ).
या भांड्यांना प्रमाणापेक्षा जास्त पाणी लागले तर ती भांडी कुजतात. तेल शोषून घेत असल्याने या उलथनं किंवा डावाचे डाग जाणं थोडं जिकरीचं काम असतं. आता जास्त पाणीही लावायचं नाही, आर्द्रतेपासून ही भांडी दूर ठेवायची आणि ती चांगली साफ व्हायला हवीत असं दोन्ही साध्य करायचं तर नेमकं काय करायचं हे आपल्याला माहित नसतं. त्यासाठीच आज आपण एक अतिशय सोपी आणि झटपट होणारी अशी एक ट्रिक पाहणार आहोत. ही ट्रिक वापरल्याने लाकडी भांडी स्वच्छ होण्यास फार वेळही लागणार नाही आणि भांडी नव्यासारखी छान चकाकतील, पाहूया ही ट्रीक कोणती .
काय आहे ट्रिक?
एका मोठ्या कढईत किंवा पातेल्यात हे डाव, चमचे चांगले बुडतील इतके पाणी घ्या. हे पाणी आणि लाकडी गोष्टी या पाण्यात घाला आणि गॅस सुरू करुन हे पाणी चांगले उकळेल असे पाहा. काहीही न करता या डावांवरचा खराब थर आणि कळकटपणा अगदी सहज निघून येईल. काही वेळ हे पाणी असेच उकळल्यानंतर या गोष्टी पाण्यातून बाहेर काढा.
आवश्यकता असल्याने खराब झालेल्या टुथब्रशने या गोष्टी हलक्याशा घासा आणि पुन्हा चांगल्या पाण्यात घाला. पाण्याने साफ केल्यानंतर, आधी ही भांडी पुसा आणि नंतर ती उन्हात ठेवा.साधारण १० ते १५ मिनीटे या गोष्टी उन्हात चांगल्या वाळल्या की या भांड्यांना मोहरीचे तेल लावून ही सगळी भांडी हवेशीर अशा मोकळ्या जागेत ठेवा.