सणासुदीचे दिवस असले की घरात असतील तेवढी माणसं कमीच पडतात. कारण खूप सारी तयारी आणि खूप कामं असतात. त्यामुळे मदतीला येणारा प्रत्येक हात त्यावेळी पाहिजेच असतो. पण आता कुटूंबाचा आकार छोटा झाला. जवळची नातेवाईक मंडळी कामानिमित्त गावोगावी, देशाेदेशी पांगली. त्यामुळे मग आपोआपच मदतीला असणाऱ्या आपल्या माणसांची संख्या कमी झाली आहे. त्यातही मुख्य कामं तर सगळी घरातल्या स्त्रियांनाच करावी लागतात. म्हणूनच ऐनवेळी पळापळ नको. आणि पुजेला बसल्यावर (Ganesh sthapana) 'हे राहिलं, ते राहिलं' असं व्हायला नको, यासाठी या काही गोष्टींची तयारी एक दिवस आधीच करून ठेवलेली बरी. (How to do preparation for Ganpati Poojan)
गणपती स्थापनेसाठी अशी करून ठेवा पुर्वतयारी
१. सजावट आणि मांडणी
गणपती जिथे बसवायचा आहे, त्यासाठी आधीच तयारी करून ठेवा. पुर्ण जागा स्वच्छ करून, हवं तसं डेकोरेशन करून बाप्पासाठी तयार करून ठेवा. गणपतीचा पाट, चौरंग, त्यावर टाकायचे वस्त्र असे सगळे तिथे रचून ठेवा. लाईटिंग आणि इतर माळा आणि त्यांची व्यवस्था आधीच करून ठेवा.
२. पुजेची थाळी
पुजेचं सामान काढून ठेवणं, यात सगळ्यात जास्त वेळ जातो. म्हणूनच पुजेच्या ताटात कलश, पाणी, विड्याची पानं, सुपारी, एक- दोन रुपयांची नाणी, गुळ, खोबरं, पंचामृत, खडीसाखर, दूध, हळद- कुंकू, गुलाल, अक्षदा, धूप किंवा उदबत्ती, काडेपेटी, पळी, संध्यापात्र, तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, दोर वाती, फुल वाती, आरतीचा दिवा, कापूर असं सगळं या ताटात तयार करून ठेवा.
३. गणपतीचं सामान
गणपतीला वहायला दुर्वा, आघाडा, जास्वंदाची फुलं लागतात. त्यामुळे ती आणली आहेत का, ते तपासून घ्या.
उकडीचे मोदक करताना फाटतात? सारण बाहेर येऊन मोदक फुटू नये म्हणून ५ टिप्स आणि खास रेसिपी
गणपतीला जानवं घालतात, मोत्यांच्या माळा, त्याच्या डोक्यावर फेटा किंवा मुकूट असं सगळं एका जागी काढून ठेवा.
४. प्रसाद आणि नैवेद्य
प्रसाद म्हणून गणपतीला पंचखाद्य आणि खिरापत प्रिय असते. ती आदल्या दिवशीच करून ठेवा.
बाप्पासाठी खास नैवेद्य, सुकामेवा-खजूराचे मोदक, पौष्टिक मोदक करण्याची सोपी रेसिपी
तसेच नैवेद्यासाठी जे कोणते मोदक करणार असाल, ते सगळं साहित्य एका जागी काढून ठेवा. म्हणजे प्रसाद- नैवेद्य झटपट होऊन जाईल.