गणपतीच्या एक दिवस आधी हरतालिकेची पूजा (Haritalika pooja) असते. कुमारिका, सुवासिनी अगदी मनोभावे ही पूजा करतात. पण यादिवशी शाळा- ऑफिसेस, कॉलेज यांना काही सार्वजनिक सुटी नसते. त्यामुळे घरातल्या सगळ्यांच्या कामाच्या वेळा आणि स्वत:चं ऑफिस असं सगळं सांभाळत अनेक जणींना पूजा करावी लागते. खरोखरच तारेवरची कसरत असते. म्हणूनच हरितालिकेच्या दिवशी ऐनवेळी होणारी गडबड टाळण्यासाठी या काही गोष्टींची पुर्वतयारी आधल्या दिवशीच करून ठेवा.
गडबड टाळण्यासाठी हरितालिकेच्या पुजेची अशी करून ठेवा तयारी- पूजा जिथे मांडणार आहात, ती जागा स्वच्छ करून, सजवून ठेवा. - पुजेसाठी वाळूचं शिवलिंग तयार करावं लागते. त्यासाठी आधल्या दिवशी आधीच वाळू आणून ती स्वच्छ धुवून ठेवा. म्हणजे दुसऱ्या दिवशी पुजेच्या वेळेपर्यंत वाळू सुकेल.- पुजेसाठी वेगवेगळ्या झाडांच्या पत्री म्हणजेच पानं लागतात. घराजवळ जी काही झाडं आहेत, त्याची ५- ५ पानं आदल्या दिवशीच काढून ठेवा. खरंतर झाडांची पानं अशा पद्धतीने वापरण्यापेक्षा एका झाडाचं एकच पान घ्या. पत्री वाहिल्याचं समाधानही होईल आणि विनाकारण झाडांची पानं तोडलीही जाणार नाहीत. फुलं तसेच ५ फळं रात्रीच आणून ठेवा.
- पुजा ज्यावर मांडणार तो चौरंग किंवा पाट आदल्या दिवशीच काढून स्वच्छ करून ठेवा. - पुजेचं ताट तयार करून ठेवा. त्यामध्ये हळद- कुंकू, गुलाल, अक्षदा, वस्त्रमाळ, २ दिवे- एक फुलवातीसाठी आणि एक दोरवातीसाठी, तसंच आरतीसाठी वेगळा दिवा, दिव्यामध्ये टाकायला तेल आणि तूप, साखर, गुळ- खोबरं, विड्याची पानं, सुपारी, एकेक रुपयांची ३- ४ नाणी, ब्लाउज पीस, ओटीची बॅग, कापूर, रांगोळीचा डबा, उदबत्ती- धूप, काडेपेटी, अत्तर, आरतीचं पुस्तक असं सगळं काढून ठेवा.- दुसऱ्यादिवशी पुजेला बसताना फक्त ऐनवेळी पंचामृत तयार करा.
म्हणजे धावपळ न होता, प्रसन्नपणे पूजा करता येईल.