लिंबू हा आपल्या स्वयंपाक घरातला आणि स्वयंपाकातला एक महत्त्वाचा पदार्थ. लिंबाशिवाय अनेक पदार्थ अपूर्णच.. पण कधी कधी असंही होतं की फ्रिजमधली लिंबं जरा सुकली, जुनी झाली की आता त्यातून फार काही रस निघत नाही. म्हणून मग बऱ्याच मैत्रिणी लिंबू सुकलेलं किंवा कडक झालेलं जाणवलं की लगेचच टाकून देतात... पण या लिंबातूनही आपण योग्य तेवढा रस काढू (tricks to get more and more juice from dried lemon) शकतो. त्यासाठी फक्त या काही सोप्या ट्रिक्स करून बघा.
अनेकदा लिंबू फ्रिजमधून काढल्या काढल्याही त्याचा भरपूर रस येत नाही. याचं कारण म्हणजे लिंबाच्या रसामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स पेक्टिन आणि सेल्युलोज असतात. तापमान थंड असलं की हे कार्बोहायड्रेट्स अधिक घट्ट बनतात, त्यामुळे कमी रस येतो. त्यामुळे लिंबू जर सुकलेलं असेल आणि त्याचं साल कडक झालं असेल तर त्यासाठी वेगळे उपाय आहेत आणि साल ओलसर असतानाही लिंबातून अधिकाधिक रस काढायचा असेल तर त्यासाठी वेगळे उपाय आहेत.
सुकलेल्या लिंबातून कसा काढायचा अधिकाधिक रस..
१. लिंबू जर कडक झालं असेल, वाळलं असेल तर एक वाटीभरून पाणी घ्या. त्या पाण्यात सुकलेलं, कडक झालेलं लिंबू टाका. ही वाटी फ्रिजमध्ये ठेवून द्या. १० ते १५ मिनिटांनी वाटी बाहेर काढा. लिंबाला जरा मऊपणा आला असेल. आता हे लिंबू तुम्ही कापून पिळलं तर नक्कीच चांगला रस निघेल.
२. जर लिंबू वाळून कडक झालेलं नसेल, पण जरा सुकलेलं असेल तर हा उपाय चांगला ठरेल. यासाठी एक वाटी गरम पाणी घ्या. या पाण्यात लिंबू ठेवा. एखाद्या मिनिटाने काढून घ्या आणि नंतर पिळा.
३. सुकलेलं पण कडक न झालेलं लिंबू तुम्ही मायक्रोव्हेवमध्ये ठेवून १० सेकंदासाठी गरम केलं तरी त्यातून नक्कीच तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त रस निघालेला दिसेल.
४. लिंबू किंवा मोसंबी या फळांमधून अधिक रस यावा यासाठी ही फळे जमिनीवर किंवा ओट्यावर, टेबलवर ठेवा आणि तळहाताने हलकासा दाब देऊन ती जमिनीवर गोल गोल फिरवा.. यामुळेही फळांमधून रस येण्याचे प्रमाण वाढते.