Join us  

कपडे धुताना वापरा ४ गोष्टी, कपडे होतील सुगंधित- पावसाळ्यात कुबट वासही येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 11:01 AM

How to get rid from bad smell of Cloths : पावसामुळे कपड्यांना कुबट वास लागला असेल तर तो जाण्यासाठी करता येतील असे सोपे उपाय

ठळक मुद्दे पावसाळ्याच्या दिवसांत हे कंडिशनर आवर्जून वापरायला हवेत. त्याचा कपड्यांचा कुबटपणा जाण्यासाठी निश्चितच फायदा होतो.  कपड्यांना वास येणे हे आरोग्यासाठी चांगले नसते, त्यामुळे ते चांगले वाळलेले आणि स्वच्छ असायला हवेत

पावसाळा म्हणजे सगळीकडे चिकचिक आणि दमट हवामान. एकदाच धो-धो पाऊस पडून गेला आणि ऊन पडलं तर ठिक, पण सतत पाऊस असेल तर सगळ्यात जास्त अडचण होते ती ओले कपडे वाळण्याची. सततच्या ओलाव्यामुळे कपडे २-३ दिवस वाळत नाहीत. असे जास्त दिवस, कपडे ओले राहीले की त्यांना एकप्रकारचा कुबट वास यायला लागतो (easy tricks to get rid of musty odur from clothes). हेच कपडे आपण घरात किंवा बाहेर अंगावर घालतो. या कपड्यांच्या ओलसरपणामुळे आपल्याला त्वचेच्या काही समस्या उद्भवण्याचीही शक्यता असते. (Housekeeping tricks) इतकेच नाही तर अंगाला कुबट वास येत राहतो तो वेगळाच. पावसाळ्यात काही वेळा सतत पडणाऱ्या पावसामुळे अजिबात ऊन न पडल्याने तुमचेही कपडे वाळत नसतील आणि त्याला कुबट वास येत असेल तर काय करता येईल याचे काही सोपे पर्याय आज आपण पाहणार आहोत (How to get rid from bad smell of Cloths). 

१. डेटॉल किंवा सॅव्हलॉन

पावसाळ्याच्या दिवसांत अनेकदा कपड्यांवर माती, चिखल उडालेला असतो. पावसाळ्यात विविध प्रकारचे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. यामध्ये ताप, सर्दी, खोकला, जुलाब यांबरोबरच त्वचेच्या समस्याही उद्भवतात. डेटॉल किंवा सॅव्हलॉन हे अँटीसेप्टीक लिक्वीड असल्याने कपड्यांवरचे जंतू निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे कपडे भिजवताना आपण पावडर किंवा लिक्विड सोप टाकतो त्यासोबतच ४ थेंब टाकल्यास कपडे स्वच्छ तर होतातच पण त्यांना कुबट वासही येत नाही. 

पावसाळ्यात मुलं वारंवार आजारी पडतात, आलं-तुळशीचा चमचाभर रस ठरतो गुणकारी, पाहा कसा घ्यायचा?

२. गुलाब पाणी 

गुलाब पाण्याला एक छान असा सुगंध असतो. साधारणपणे आपल्या घरात गुलाबपाणी सहज उपलब्ध असते. अनेकदा सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरले जाणारे हे गुलाब पाणी घरात वेगवेगळ्या गोष्टींसाठी उपयुक्त ठरु शकते. तसेच ते कपडे धुवून झाल्यानंतर खळबळताना किंवा पिळताना घातल्यास कपड्यांचा कुबट वास जाण्यास मदत होते. 

३. अत्तर 

पूर्वीप्रमाणे आता हाताला लावण्यासाठी अत्तराचा फारसा उपयोग केला जात नसला तरी अत्तराची सर आताच्या महागड्या परफ्युमना येणारच नाही. अत्तराचा सुगंध इतका मोहक असतो की कित्येक तास आजुबाजूच्या व्यक्तींना तो सुखावत राहतो. हल्ली अनेकदा आपण हाताला अत्तर लावत नाही पण आपल्या घरात अत्तराच्या बाटल्या असतात. पावसाळ्याच्या दिवसांत कपडे धुवून झाल्यावर ते खळबळताना त्यात २ थेंब अत्तर टाकल्यास कपड्यांना त्याचा छान वास लागतो आणि कपडे बराच काळ सुगंधी राहतात. 

४. फॅब्रिक कंडीशनर 

सध्या बाजारात कपड्यांना सुगंध यावा यासाठी फॅब्रिक कंडिशनर मिळतात. यामध्ये वेगवेगळ्या फुलांचे वास असणारे कंडीशनर असतात. कपडे खळबळताना हे कंडीशनर टाकले तर कपड्यांना अतिशय छान असा सुगंध येतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत हे कंडिशनर आवर्जून वापरायला हवेत. त्याचा कपड्यांचा कुबटपणा जाण्यासाठी निश्चितच फायदा होतो.  

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्समानसून स्पेशल