Join us  

घरातल्या फर्निचरला, गाद्यांना ढेकूण झालेत, चावल्याने सतत झोपमोड होते? पाहा घरच्या घरी ढेकूण घालवण्याचे सोपे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2023 1:35 PM

How To Get Rid From Bed Bugs : घरच्या घरी सोप्या उपायांनीही आपण ढेकणांना घरातून हद्दपार करु शकतो..

घरात झुरळं, पाली किंवा अगदी मुंग्या, डास झाले तर एकवेळ ठिक आहे. पण ढेकूण झाल्यावर मात्र आपल्या झोपेची पूर्ण वाट लागते. लाकडी फर्निचरला ढेकूण जास्त प्रमाणात होत असल्याने या फर्निचरची नियमितपणे साफसफाई करणे आवश्यक असते. एकदा घरात एखादा जरी ढेकूण आला की त्यांची संख्या इतकी वेगाने वाढते की काही दिवसांत सगळीकडे हे ढेकूण पसरतात. माणसाच्या शरीराचे रक्त पिणारे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ढेकणांमुळे झोपेची पूर्ण वाट लागते. मग हे ढेकूण घालवण्यासाठी आपण घरच्या घरी काही उपाय करतो तर कधी थेट पेस्ट कंट्रोलच करण्याचा निर्णय घेतो. पण घरच्या घरी सोप्या उपायांनीही आपण ढेकणांना घरातून हद्दपार करु शकतो. ते कसे, पाहूया (How To Get Rid From Bed Bugs)...

१. ढेकूण हे जास्त करुन लाकडी फर्निचरला आणि गाद्यांना होतात. गाद्यांच्या कडांमध्ये ते दडून बसतात. त्यामुळे सगळ्यात आधी गादी बेडवरुन काढून २ ते ३ दिवसांसाठी कडक उन्हात वाळत ठेवायची. कडक उन्हामुळे ढेकूण यातून निघून जाण्याची शक्यता असते.  

(Image : Google)
 

२. त्यानंतर कापराच्या वड्या घेऊन त्याची बारीक पूड करा, यामध्ये कडुलिंबाचं तेल घाला. यात थोडं पाणी घालून हे मिश्रण चांगले एकजीव करा. 

३. कापसाचे छोटे बोळे करुन ते या मिश्रणात बुडवावेत आणि गाद्या, फर्निचर यांच्या वर, खाली हे बोळे ठेवावेत. याच्या उग्र वासाने ढेकूण पळून जाण्यास मदत होईल.

४. आणखी एका उपायाने ढेकूण घालवता येऊ शकतात. यासाठी कापूराची पावडर घेऊन त्यात दालचिनी पावडर किंवा बेकींग सोडा घालायचा. 

(Image : Google)

५. पावडरचे हे मिश्रण पेपरच्या तुकड्यावर घेऊन त्याच्या लहान लहान पुड्या करायच्या आणि त्या गादी, बेड, सोफा सेट यांच्या आसपास ठेवायच्या. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास ढेकूण निघून जाण्यास मदत होते. 

६. याशिवाय कडुलिंब, पुदिना यांचे तेल किंवा पाणी शिंपडल्यासही ढेकूण जाण्यास मदत होते. यांचा वास स्ट्रॉंग असल्याने ढेकूण घालवण्यासाठी त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो.  

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी