घराची, किचनची कितीही साफसफाई केली तरी ट्रॉलीमध्ये, ओट्यावर, कपाटांमध्ये सतत झुरळं दिसतात. अनेकदा ही झुरळं घालवण्यासाठी आपण घरात पेस्ट कंट्रोल करतो, खडू मारतो किंवा काही विषारी औषधांची फवारणी करतो. पण या उपायांनी ती तात्पुरती गायब होतात आणि काही दिवसांनी पुन्हा दिसायला लागतात. सुरुवातीला २ किंवा ४ इतक्या संख्येत असणाऱ्या या झुरळांची संख्या काही दिवसांत अचानक वाढते. झुरळं थोडी जागा मिळाली की झटपट अंडी घालतात आणि आपली संख्या वाढवतात. (How To Get Rid from Cockroaches home Remedy).
अगदी लहान आकारापासून ते मोठ्या आकारापर्यंत विविध प्रजातीतील झुरळं घरोघरी दिसतात. खायच्या पदार्थांवर, भांड्यामध्ये फिरणारी झुरळं पाहून आपल्याला किळस तर येतेच पण त्यापेक्षाही अशाप्रकारे खाण्या-पिण्याच्या गोष्टींवर झुरळांचा वावर आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतो. कारण यामुळे पोटाचे विकार किंवा अन्य काही इन्फेक्शन्स होण्याची शक्यता असते. मग ही झुरळं कमी होण्यासाठी नेमकं काय करायचं याचा अगदी सोपा, घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत. या उपायाने झुरळं गायब तर होतीलच पण घरही स्वच्छ राहण्यास मदत होईल.
उपाय काय ?
१. एका कापडावर स्प्रे बाटलीने व्हाईट व्हिनेगर फवारावे आणि या फडक्याने ज्या ठिकाणी झुरळं येतात ती जागा पुसावी.
२. व्हिनेगरने पुसल्याने कपाटांमधील तेलाचे किंवा अन्य कसले डाग जाण्यास तर मदत होतेच पण त्याच्या उग्र वासाने झुरळं याठिकाणी फिरकत नाहीत.
३. अनेकदा आपण कपाटात किंवा ट्रॉलीमध्ये सामान ठेवताना खाली वर्तमानपत्राचा वापर करतो. पण असे करु नये कारण त्यामुळे झुरळं जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते.
४. हा उपाय अतिशय सोपा असून त्यासाठी विशेष खर्च येत नाही आणि जास्त कष्टही घ्यावे लागत नाहीत. त्यामुळे घरातील झुरळं पळवून लावण्यासाठी हा उपाय नक्की ट्राय करा.