झुरळं ही अनेक घरांमधील एक महत्त्वाची समस्या. झुरळं फक्त घाण असेल तरच होतात असा आपला सामान्यपणे समज असतो. पण हा समज चुकीचा असतो. घर कितीही मोठे आणि पॉश असले तरी त्याठिकाणीही झुरळं होतातच. सतत कितीही साफसफाई केली तरी ट्रॉलीमध्ये किंवा अगदी ओट्यावर फिरणारी झुरळं पाहून आपल्याला नकोसं वाटतं. स्वयंपाकघरात सतत फिरणारी झुरळं पाहिली की आपल्याला वैताग येतो. सुरुवातीला कमी असणारी ही झुरळं हळूहळू जागा मिळेल तिकडे अंडी घालतात आणि काही दिवसांत त्यांची संख्या अचानक दुप्पट-तिप्पट होते. खायच्या पदार्थांवर, भांड्यामध्ये फिरणारी झुरळं पाहून आपल्याला किळस तर येतेच पण त्यापेक्षाही अशाप्रकारे खाण्या-पिण्याच्या गोष्टींवर झुरळांचा वावर आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतो. अशा या झुरळांचा बंदोबस्त कसा करायचा यासाठी काही सोपे आणि सहज करता येतील असे उपाय पाहूया....
१. लवंग
लवंग हा मसाल्यातील एक महत्त्वाचा पदार्थ. अनेक पदार्थांमध्ये आपण स्वाद वाढण्यासाठी लवंगाचा वापर करतो. हेच लवंग झुरळं पळवून लावण्यासाठीही वापरली जाऊ शकतात. लवंगाला एकप्रकारचा उग्र वास असतो. या वासामुळे झुरळं पळून जातात. यासाठी फक्त ज्याठिकाणी झुरळं असतात तिथे लवंग ठेवायची. या लवंगांचा वास गेला तर नवीन लवंग ठेवायची.
२. केरोसिन
घरातील कामांसाठी केरोसिन अतिशय कमी प्रमाणात वापरले जाते. पण झुरळांपासून सुटका करायची असेल तर केरोसिन हा उत्तम उपाय आहे. घरात ज्या भागात जास्त प्रमाणात झुरळे दिसतात त्याठिकाणी केरोसिनचा स्प्रे मारला तर काही तासांत या वासाने झुरळे पळून जातील. स्वयंपाकघरात ज्याठिकाणी केरोसिन मारु त्याठिकाणी पाणी मिसळून केरोसिन मारायला हवे. केरोसिनचा वापर केलेल्या ठिकाणी लहान मुलांना अजिबात जाऊ देऊ नये.
३. कडुलिंब झुरळं फिरत असलेल्या ठिकाणी कडूलिंबाच्या पानांचे तेल किंवा पावडर टाकावी. कडूलिंबाच्या पानांमध्ये असलेल्या उग्र वासामुळे झुरळे लवकर मरतात. झुरळांना वास खूप लवकर येत असल्याने ते वासाच्या दिशेने जातातच. झुरळांपासून सुटका करण्यासाठी हा एक उत्तम उपाय ठरु शकतो. त्यामुळे पेस्टीसाईडसपेक्षा या घरगुती उपायांचा अवलंब करुन पाहायचा.
४. तमालपत्र
हाही मसाल्याच्या पदार्थांपैकी एक अतिशय महत्त्वाचा पदार्थ आहे. स्वयंपाकासोबतच झुरळं मारण्यासाठी या पदार्थाचा चांगला उपयोग होतो. या पानांचे लहान-लहान तुकडे करुन ते वेगवेगळ्या कोपऱ्यांत ठेवून द्यायचे. या वासामुळे झुरळांचा चांगला बंदोबस्त होतो.