Join us  

उन्हाळ्यात घामामुळे कपडे-रुमाल-टॉवेलला कुबट वास येतो? ४ उपाय, दुर्गंधी गायब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2023 2:53 PM

How To Get The Smell Out Of Towels In Summer Season : उन्हाळ्यात घामानं येणारी दुर्गंधी नकोशी वाटते, त्यावर हे सोपे घरगुती उपाय

उन्हाळा म्हटलं की खूप घाम व गर्मी यामुळे जीव कासावीस होतो. उन्हाळ्यात आपल्याला सगळ्यांचं एरवी पेक्षा थोडा जास्तच घाम येतो. हा घाम पुसण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे रुमाल आणि टॉवेलचा वापर करतो. उन्हाळ्यात सतत चेहरा व शरीरावरुन ओघळणारा घाम पुसण्याशिवाय आपल्याकडे काहीच पर्याय नसतो. उन्हाळ्यातील उष्णतेमुळे येणाऱ्या घामाच्या धारांमुळे उन्हाळ्यात बाहेर पडणे नकोसे वाटते. 

अनेकांना अंडर आर्मस किंवा मानेच्या खालच्या बाजूला घाम येतो. अंगाला वारंवार घाम येऊन मग अंगाला घामाचा वास येतो. अशावेळी, आपण टॉवेल किंवा रुमालाने लगेच घाम पुसतो. आपल्या अंगाला येणारा घाम आणि घामाचा वास या टॉवेलमध्ये शोषून घेतला जातो. परिणामी, या टॉवेलला देखील कुबट वास यायला लागतो. आपल्यापैकी बऱ्यचजणांना उन्हाळ्यांत टॉवेलला येणाऱ्या कुबट वासाच्या समस्येला सामोरे जावे लागले असेल. असे कुबट वास येणारे टॉवेल, रुमाल कितीही धुतले तरी हा वास जात नाही अशावेळी काय करावे हा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो. आपण काही सोपे घरगुती उपाय वापरुन उन्हाळ्यांत टॉवेल व रुमालांना येणारा कुबट वास घालवू शकतो(How To Get The Smell Out Of Towels In Summer Season).    

टॉवेलमधून कुबट वास का येतो ? 

उन्हाळ्यात आपल्या टॉवेलमधून कुबट वास येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला खूप घाम येतो. आपण हा वारंवार येणारा घाम टॉवेलने पुसत असतो. असे केल्याने काहीवेळा आपल्या शरीराच्या घामाचा वासही टॉवेलमध्ये अनेक वेळा शोषला जातो.  त्यामुळे उन्हाळ्यांत टॉवेलला कुबट वास येतो. त्याचबरोबर कधीकधी आपण आंघोळ झाल्यानंतर ओला टॉवेल तसाच बाथरुमध्ये ठेवतो त्यामुळे सुद्धा आपल्या टॉवेलला कुबट वास येऊ शकतो. 

टॉवेलमधून येणाऱ्या या कुबट वासाला कसे दूर करावे ? 

१. उन्हाळ्याच्या दरम्यान टॉवेलमधून येणारा कुबट वास दूर करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत. या दिवसांत आपल्या शरीराला खूप घाम येत असल्याकारणाने, एक टॉवेल दोन दिवसांपेक्षा जास्त वापरु नये. दोन दिवस वापरुन लगेच धुवायला टाकावे. आपण जर एकच टॉवेल बरेच दिवस दिवस वापरत राहिलात तर त्यातून कुबट वास यायला सुरुवात होते. त्यामुळे उन्हाळ्यांत किमान २ दिवसाआड आपला टॉवेल बदला किंवा टॉवेल धुवून स्वच्छ ठेवा. 

२. अंघोळीनंतर ओला टॉवेल वापरुन झाल्यानंतर तो तसाच बाथरूममध्ये ठेवू नका. बाथरुमचा दरवाजा हा सतत बंद असल्याकारणाने तिथे फारशी हवा खेळती रहात नाही, परिणामी टॉवेल न सुकता तसेच ओले चिंब रहाते. म्हणून टॉवेल वापरुन झाल्यानंतर ते लगेच बाथरूमच्या बाहेर वाळत घालावे. यामुळे टॉवेलमधून कुबट वास येत नाही. 

३. उन्हाळ्याच्या दिवसांत आपला टॉवेल वाळून संपूर्णपणे कोरडा झाला आहे याची खबरदारी घेऊनच मग तो कपाटात ठेवावा. ओला टॉवेल वाळवण्यासाठी आपण त्याला कडक सूर्यप्रकाशात संपूर्णपणे वाळवून घेतले पाहिजे. जर आपण टॉवेलला सूर्यप्रकाशात संपूर्ण कोरडे होईपर्यंत वाळवून घेतले तर त्यातून कुबट वास येत नाही.   

टॉवेलमधून येणारा हा कुबट वास घालविण्यासाठी टॉवेल कसे धुवावे? 

१. टॉवेल धुण्यासाठी सर्वप्रथम एका टबमध्ये पाणी घेऊन त्यात डिटर्जंट आणि १ टेबलस्पून बेकिंग सोडा घालावा. डिटर्जंट आणि बेकिंग सोडा पाण्यांत संपूर्णपणे विरघळवून घ्यावे. त्यानंतर त्यात टॉवेल १५ ते २० मिनिटे बुडवून ठेवावे. त्यानंतर एखाद्या सॉफ्ट दातांच्या ब्रशने टॉवेल रगडून धुवावे. मग स्वच्छ पाण्याने धुवून कडक सूर्यप्रकाशात वाळत घालावे. यामुळे आपले टॉवेल स्वच्छ धुतले जाईल व यातून येणारा कुबट वास नाहीसा होईल. 

२.  टॉवेलचा कुबट वास घालवण्यासाठी लिंबाचा उपयोग करावा. लिंबामध्ये आम्लधर्मीय गुणधर्म असतत. लिंबू कुबट वास आणणाऱ्या बुरशीला तयार होवू देत नाही. टॉवेलला कुबट वास येवू नये म्हणून बादलीत पाणी घ्यावं. त्यात लिंबाचा रस घालावा. या पाण्यात टॉवेल भिजवावेत. १५ ते २० मिनिटानंतर टॉवेल स्वच्छ पाण्याने धुवावेत. या उपायाने टॉवेलला कुबट वास येत नाही. 

३. स्वयंपाकात उपयोगी पडणारं व्हिनेगर स्वच्छतेच्या कामासाठीही उपयोगी पडतं. व्हिनेगरमध्येही आम्लधर्मीय गुणधर्म असतात. या गुणधर्मामुळेच दुर्गंध निर्माण करणारे जिवाणू नष्ट होतात. एका टबमध्ये पाणी घेऊन त्यात २ ते ३ टेबलस्पून व्हिनेगर घालावे किंवा टॉवेलला जिथे दुर्गंध येत असेल त्या ठिकाणी थोडं व्हिनेगर लावावं. थोड्या वेळाने टॉवेल नेहमीप्रमाणे धुतले की टॉवेलला कुबट वास येत नाही. 

४. उन्हाळ्यांत सूर्यप्रकाश भरपूर असतो त्यामुळे सूर्यप्रकाश नाही असा प्रश्नच येत नाही, परंतु सूर्युप्रकाश नसला तरी टॉवेल हवेशीर ठिकाणी सुकवावेत. हवा नसलेल्या ठिकाणी टॉवेल सुकण्यास घातल्यास टॉवेल दीर्घकाळ ओलसर राहून टॉवेलला कुबट वास येतो. हवा येईल अशा ठिकाणी टॉवेल सुकवावेत किंवा टॉवेल पंख्याखाली सुकवावेत.

टॅग्स :स्वच्छता टिप्स