Join us

कपाटात हँगरला लावलेल्या पँट सारख्या खाली पडतात? पाहा हँगरला पँट लावण्याची सोपी ट्रिक, वाचेल वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2024 18:36 IST

How to hang pants and jeans : इस्त्रीची किंवा एकदा वापरलेली पँट हँगरला अडकवण्याची सोपी पद्धत..

कपडे धुतले किंवा इस्त्री करुन आले की ते कपाटात नीट लावून ठेवणे हे एक महत्त्वाचे काम असते. घड्या केलेले कपडे नीट जसेच्या तसे ठेवले गेले तर बाहेर जाताना धावपळ होत नाही आणि आपल्याला झटपट हवे ते कपडे मिळतात. हल्ली बाजारात कपडे ठेवण्यासाठी विविध प्रकारचे ऑर्गनायझरही मिळतात. पण त्यापेक्षा हँगरला कपडे लावण्याची पारंपरिक पद्धत केव्हाही जास्त सोयीची वाटते. कपाटात समोरच कपडे हँगरला लावलेले असतील तर ते पटकन डोळ्यासमोर असल्याने निवडणे आणि काढून घालणे सोपे जाते (How to hang pants and jeans). 

हँगरला साडी, शर्ट, पंजाबी ड्रेस लावणे एकवेळ सोपे असते. पण पँट हँगरला अडकवणे थोडा अवघड टास्क असतो. कारण या पँट लगेचच खाली पडतात आणि त्याची इस्त्री मोडते. इतकेच नाही तर आपले काम वाढते आणि वेळही वाया जातो. मग असे होऊ नये म्हणून पँट हँगरला नेमकी कशी अडकवायची किंवा लावायची हे आपल्याला माहित असायला हवे. आज आपण त्यासाठीच उपयुक्त अशा २ महत्त्वाच्या आणि सोप्या टिप्स समजून घेणार आहोत.  शशांक आलशी यांनी या टिप्स सांगितल्या असून यामुळे पँट लावणे नक्कीच सोपे होते. 

१. कॅज्युअल किंवा जीन्स पँट

(Image : Google)

सगळ्यात आधी पँट बेडवर पसरुन घ्यायची. हँगर घेऊन तो पँटच्या एका पायावर ठेवायचा. हँगर ठेवलेल्या पायाचा अर्धा भाग दुमडायचा आणि मग पँट मध्यभागातून दुमडायची. त्यानंतर दुसऱ्या पायाचा अर्धा भाग हँगरमध्ये घालायचा. यामुळे पँटचे दोन्ही पाय अतिशय परफेक्ट अडकले जातात अशाप्रकारे हँगरला अडकवलेली पँट अजिबात पडण्याची शक्यता नसते. त्यामुळे आपण हा हँगर कपाटातील दांडीला अडकवू शकतो. 

२. फॉर्मल पँटसाठी 

फॉर्मल पँट हँगरला लावताना सगळ्यात आधी मध्यभागी बटण लावतो त्याठिकाणी फोल्ड करायची. बटण न लावता दोन्ही बक्कल एकमेकांना जोडायची म्हणजे दोन्ही पाय एकमेकांवर येतात.  मग ही पँट बेडवर किंवा कोणत्याही सपाट भागावर पसरुन ठेवायची. मग हँगर घेऊन वरच्या पायातून आत घालायचा आणि वरच्या बाजूला घेऊन दुमडायचा. त्यानंतर खाली राहीलेला दुसरा पाय हँगरमधून घालायचा आणि दुमडायचा. यामुळे पँट नीट अडकलेली राहते आणि ती हँगरवरुन सटकण्याची शक्यता राहत नाही. यामुळे पँट एकदा वापरुन नंतर परत वापरायची असेल तर पँटला घड्याही पडत नाहीत आणि ती जशीच्या तशी परत वापरता येते. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स