मध आरोग्यासााठी अनेक अर्थांनी उपयुक्त असतो. म्हणूनच नैसर्गिकरित्या मधमाश्यांच्या पोळ्यापासून तयार होणाऱ्या या मधाची किंमतही खूप जास्त असते. पण या मधाला जितकी मागणी असते तितका पुरवठा नसेल तर बनावट मध तयार करुन तो बाटलीमध्ये भरुन विकला जातो. चव, रंग सारखाच असल्याने आणि नामांकित ब्रँड असल्याने आपणही अनेकदा मध खरेदी करताना फसतो. घरी आल्यावर बाटली फोडली आणि ती फ्रिजमध्ये ठेवली की मग त्यात साखर जमा व्हायला लागते आणि मग हा मध बनावट आहे हे आपल्या लक्षात येते. भरपूर पैसे देऊनही आपल्याला अशाप्रकारे बनावट मध विकल्यामुळे आणि शुद्ध मध मिळाला नाही म्हणून चिडचिड होत राहते. पण मध खरेदी करतानाच काही सोप्या टेस्ट केल्या तर आपण अशा फसवणुकीपासून काही प्रमाणात दूर राहू शकतो. या टेस्ट कशा करायच्या ते पाहूया (How To identify Pure Honey 2 Simple Test)...
१. एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये चमच्याने मध घालायचा. हा मध खाली जाऊन बसला आणि पाण्यात विरघळला नाही तर हा मध शुद्ध आहे असे ओळखावे. जर हा मध शुद्ध नसेल तर एकतर तो पाण्यात मिसळला जातो नाहीतर तो पाण्यावर तरंगतो.
२. एक टूथपिक घ्यायची आणि त्याला मध लावायचा. त्यानंतर काडेपेटीतील काडीच्या साह्याने ही टूथपिक जाळण्याचा प्रयत्न करायचा. जर ही टूथपिक लगेच जळाली तर हा मध शुद्ध आहे हे ओळखावे. पण अनेकदा मधामध्ये शुगर सिरप, कॉर्न सिरप असे काही ना काही घालून त्याला घट्टपणा आणला जातो. अशावेळी त्या मधात एकप्रकारचे मॉईश्चर जमा होते. त्यामुळे ही टूथपिक लगेच जळत नाही.
३. तसंच आपण खरेदी करत असलेली मध शुद्ध असावा असं वाटत असेल तर हा मध आपल्या आसपासच्या स्थानिक बाजारातून खरेदी करायला हवा. स्थानिक बाजारपेठेत शुद्ध मध मिळण्याची शक्यता तुलनेने जास्त असते.