उन्हाचा पारा आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आतापर्यंत भर दुपारी घराबाहेर पडायला नको वाटत होतं. पण आता मात्र उष्णता एवढी वाढली आहे की घरात बसायलाही नको वाटतं. कारण उन्हाचा खूप जास्त त्रास घरातही होतो. घरातही उन्हाच्या चांगल्याच झळा लागतात. उन्हाळ्याची ही तिव्रता घरात जाणवू नये, म्हणून अनेक जण एसी बसवतात. पण एसीची किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशी नसते (How to keep your house cool in summer without using ac). म्हणूनच एसी घेण्यावर आणि त्याचं बिल भरण्यावर भरमसाठ पैसे खर्च करण्यापेक्षा घरात हे काही साधे- सोपे बदल करून पाहा. घर थंड होण्यास नक्कीच मदत होईल. (tips and tricks to make your house cool in hot summer)
उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी उपाय
१. तुमच्या घरात जर गडद रंगाचे पडदे, बेडशीट, सोफाकव्हर असतील तर ते सगळे उन्हाळा संपेपर्यंत ठेवून द्या. उन्हाळ्याच्या दिवसात नाजूक नक्षी असणारे आणि फिक्या रंगाचे पडदे, बेडशीट आणि सोफा कव्हर वापरा.
२. उन्हाळ्याच्या दिवसात घरामध्ये इनडोअर प्लांट्स आणून ठेवा. हाॅलमधील एखाद्या कोपऱ्यामध्ये, खिडकीमध्ये, टिपॉयवर खरेखुरे इनडोअर प्लांट्स आणून ठेवल्याने डोळ्यांना सुखद गारवा मिळतो.
३. मोगरा, मधुमालती, मधुकामिनी ही सुगंधी फुले या दिवसांत असतात. घरातल्या एखाद्या भांड्यात पाणी भरा आणि त्यात ही फुलं टाकून कुलरसमोर ठेवा. कुलरच्या हवेमुळे फुलांचा सुगंध घरभर दरवळेल आणि घर थंड वाटेल.
४. एका भांड्यात बर्फ घाला आणि ते भांडं कुलरच्या समोर ठेवा. यामुळे कुलरमधून येणारी हवा आणखी थंड होईल आणि घरात गारवा वाटेल.
५. दुपारी १ ते ५ यादरम्यान उन्हाची तिव्रता खूप वाढलेली असते. त्यामुळे या वेळेत दारं- खिडक्या बंद करून ठेवा. दुपारच्या उष्ण झळा घरात येणार नाहीत.
६. ज्या बाल्कनीतून किंवा खिडकीतून खूप ऊन येतं, तिच्यावर हिरवा पडदा लावा. दुपारच्या वेळी त्या पडद्यावर पाणी शिंपडा. गरम वाऱ्याऐवजी थंड वारं घरात येईल.