Join us  

लोखंडी कढई वापरुन वापरुन काळीकुट्ट झाली? कढई नव्यासारखी चमकण्यासाठी २ सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2023 4:22 PM

How To Keep Your Iorn Kadai or Pan Sparkling Clean : कढईत खाली काही लागलं की ते निघता निघत नाही आणि कढई काळीकुट्ट होऊन जाते.

शरीरात लोहाची कमतरता किंवा लोह मिळावं यासाठी हल्ली बरेच जण घरोघरी लोखंडाची कढई किंवा तवा, पळी अशी इतर भांडी वापरताना दिसतात. भाजी, आमटीला फोडणी देण्यासाठी या कढया आवर्जून वापरल्या जातात.  पूर्वीच्या काळी स्टील आणि अॅल्युमिनिअम आणि नॉन स्टीक यांसारखी भांडी फारशी उपलब्ध नव्हती तेव्हा तांबे, पितळ आणि लोखंडाचीच भांडी स्वयंपाकासाठी वापरली जायची. आता पुन्हा नव्याने लोखंडी भांडी वापरण्याचे फॅड आले आहे. शरीराला पुरेशा प्रमाणात लोह मिळावे यासाठी अनेकदा डॉक्टरही लोखंडी भांड्यांचा वापर करायला सांगतात. यामध्ये केलेले पदार्थ काही प्रमाणात काळे होत असल्याने कुटुंबातील मंडळी नाक मुरडतात. पण यात केलेल्या पदार्थांना येणारी लोखंडाची चव वेगळाच स्वाद देते (How To Keep Your Iorn Kadai or Pan Sparkling Clean). 

हे सगळे खरे असले तरी लोखंडी भांड्यांमध्ये अनेकदा लोह जमा होतं. मग हे लोह हाताला लागण्या इतपत जास्त असल्याने त्याची चव आणि वास अन्नपदार्थांना लागतो. तसंच अशाप्रकारे लोह पोटात जाणं योग्य असतं का याबाबतही आपल्या मनात साशंकता असते. इतकेच नाही तर काही वेळा या कढईत खाली काही लागलं की ते निघता निघत नाही आणि कढई काळीकुट्ट होऊन जाते. अशावेळी लोखंडी कढई साफ करण्यासाठी नेमकं काय करायचं ते माहित असायला हवं. उमा रघुरामन या इन्स्टाग्रामवर मास्टर शेफ मॉम नावाने एक पेज चालवतात. त्यावर त्या नेहमी काही खास टिप्स, रेसिपी शेअर करत असतात. आताही त्यांनी लोखंडी कढई साफ करण्यासाठी अशीच एक सोपी युक्ती सांगितली आहे. ती कशी करायची पाहूया...  

1. एखादा पदार्थ आपलं लक्ष नसताना लागतो आणि मग तो कढईला खालच्या बाजुने चिकटतो. अशा खराब झालेल्या कढईमध्ये गरम पाणी घाला. झाऱ्या किंवा उलथनं घेऊन खाली खराब झालेला भाग त्यानेच थोडा खरडून घ्या. त्यानंतर, साबण आणि स्क्रबरने कढई धुवा. आता कढई एकदम नव्यासारखी चमकेल. 

2.प्रत्येक वॉश करताना कढईची काळजी न घेतल्यास, विशेषत: तव्याच्या हँडलजवळ काही हट्टी डाग जमा होतात. लोखंडी कढईमध्ये काही तळले तर हमखास असे होते. यासाठी तुम्ही चिंच किंवा लिंबाच्या साली/कापरासोबत पाणी घालून २०-२५ मिनिटे उकळू शकता. पुन्हा झाऱ्याने किंवा उलथन्याने हा खालचा भाग खरडून काढा. नंतर रात्रभर किंवा काही तास पाण्यात भिजवू शकता आणि नंतर साबण वापरून स्क्रब करू शकता. या उपायाने कढई किंवा पॅन चमकायला मदत होईल. 

याच टिप्सचा वापर करुन आपण स्टेनलेस स्टील, अॅल्युमिनियम अशा सगळ्याच प्रकारच्या कढई साफ करु शकतो. 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सकिचन टिप्स