घराघरांत गणपती बाप्पांचे आगमन होण्यासाठी आता काही मोजकेच दिवस बाकी आहेत. बाप्पांच्या स्वागतासाठी प्रत्येक घराघरांतून जय्यत अशी तयारी केली जात आहे. गणपती बाप्पांच्या बैठकीसाठी आसनापासून ते डेकोरेशन पर्यंत अगदी प्रत्येक गोष्टीची अगदी लगबग सुरु आहे. गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान झाले की पुढेच दहा दिवस आपण त्यांची मनोभावे पूजाअर्चा करतो. पूजेदरम्यान आपण गणपती बाप्पांना वेगवेगळ्या फुलांपासून तयार झालेले हार घालतो. तसेच सध्या बाजारांत बाप्पांसाठी अनेक प्रकारच्या सुंदर माळा आणि कंठी विकायला ठेवलेल्या आपण पाहिल्याचं असतील(How To Make a Cotton Vastramala).
बाजारांत विकत मिळणाऱ्या या मोठमोठाल्या माळा, कंठी, हार घालूंन आपण घरच्या गणपतीचे रुप अधिकच आकर्षक करतो. यासोबतच गणपती बाप्पांना कापसाचा वापर करून तयार केलेली वस्त्रमाळ घालावी लागते. शक्यतो आपण कापूस घेऊन त्याला एका ठराविक अंतरावर पीळ देऊन मग त्यावर हळद कुंकू लावून वस्त्रमाळ तयार करतो. परंतु आता या पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या जाणाऱ्या वस्त्रमाळेला थोडासा मॉर्डन टच देत आपण त्यापासून सुंदर अशी कंठी तयार करू शकतो. नेहमीच्याच कापसाचा वापर करून आपण झटपट तयार होणारी वस्त्रमाळ घरच्याघरी तयार करु शकतो. ही सुंदर नाजुकशी कापसाची वस्त्रमाळ नेमकी कशी तयार करायची ते पाहूयात(How To Make Cotton Flower Vastra Mala).
कापसाची कंठी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :-
१. कापूस
२. पाणी
३. फेविकॉल
४. टिकली
५. लेस
६. स्टॅप्लर पीन
कापसाची सुंदर कंठी कशी तयार करावी ?
१. कापसाची सुंदर कंठी तयार करण्यासाठी आपण मेडिकल मधून पांढराशुभ्र असा कापूस विकत आणावा. तुम्हाला जेवढ्या लांबीची कंठी हवी असेल तेवढ्या लांब या कापसाच्या ३ उभ्या पट्ट्या कापून घ्याव्यात. या ३ उभ्या लांबीच्या पट्ट्या सेम आकाराच्या आणि सेम लांबीच्या असतील हे पाहा.
२. आता एका छोट्या वाटीमध्ये पाणी आणि फेविकॉल हे दोन्ही समप्रमाणात घेऊन त्याचे पातळसर द्रावण तयार करून घ्यावे. त्यानंतर कापसाची एक पट्टी घेऊन जसे आपण वस्त्र तयार करतो, तसेच एका ठराविक अंतरावर पीळ देऊन वस्त्र तयार करुन घ्यावे. पाणी आणि फेविकॉलच्या द्रावणात हाताचा अंगठा आणि पहिले बोट बुडवून बोटाना हे द्रावण हलकेच लावून मग त्याच दोन बोटांच्या मदतीने कापसाला पीळ देत राहावे. अशाप्रकारे कापलेल्या तीनही पट्ट्यांचे वस्त्र तयार करून घ्यावे.
३. आता या कापसाच्या तीनही उभ्या पट्ट्यांचे वस्त्र तयार करुन घेतल्यानंतर या तिन्ही माळा सरळ रेषेत एका बाजूला एका अशा उभ्या ठेवून द्याव्यात. त्यानंतर आपण जशी केसांची वेणी घालतो तसेच या तीन वस्त्रांची देखील वेणी घालून घ्यावी. जसजसे आपण या वस्त्रांची वेणी घालतो तसे या वस्त्राला फुलांचा आकार मिळून छानशी कंठी तयार होते. जिथे फुलांचा आकार तयार होतो तिथे बरोबर मधोमध आपल्या आवडत्या किंवा लाल रंगांची टिकली लावून द्यावी. संपूर्ण वस्त्रांची वेणी घातल्यानंतर या कापसाच्या फुलांची कंठी तयार होईल. सगळ्यात शेवटी या कंठीच्या शेवटच्या दोन टोकांना स्टॅप्लर पिनच्या मदतीने लेस लावून घ्यावी जेणेकरून आपण ही कंठी अतिशय सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांना घालू शकता.
अशाप्रकारे आपण गणपती बाप्पांसाठी नेहमीची वस्त्रमाळ करण्यापेक्षा सुंदरशी नाजूक कंठी घरच्याघरी झटपट तयार करु शकतो.