रोजच्या घाई गर्दीत फर्निचर, खिडक्यांच्या काचा, दाराच्या कड्या कोयंडे यांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. पण त्याचाच परिणाम म्हणजे खिडक्यांच्या काचांवर कसलेकसले चिवट डाग पडतात, फर्निचरवर असे काही डाग पडतात जे निघता निघत नाहीत. अशा वेळेस काय वापरलं (how to clean furniture and mirror) म्हणजे डाग जातील हे काही उमजत नाही. खिडक्यांच्या काचांवर आणि फर्निचरवर कितीही चिवट डाग पडले तरी घरच्याघरी तयार केलेल्या क्लीनर्सद्वारे (homemade cleaner) सहज काढले जातात. बेकिंग सोडा, लिंबू आणि मीठ, व्हिनेगर आणि डिशवाॅशिंग लिक्विड यांचा वापर करुन दारं खिडक्यांच्या काचा, फर्निचर चकाचक करता येतात. जो उपाय आपण बाहेर शोधत असतो (how to make cleaner at home) तो घरातल्या घरात सहज उपलब्ध असतो याची जाणीव घरगुती क्लीनर्सचा वापर केल्यावर नक्कीच लक्षात येईल.
Image: Google
काचा-फर्निचर स्वच्छ करणारे घरगुती क्लीनर्स
1. घरातल्या साफसफाईसाठी बेकिंग सोडा परिणामकारक आहे. टाइल्स किंवा फर्निचरवरचा तेलकट, मेणचट चिकटपणाही बेकिंग सोड्याच्या सहाय्यानं सहज घालवता येतो. फर्निचरला पडलेले डाग घालवण्यासाठी बेकिंग सोडा घ्यावा. त्यात् थोडं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट फर्निचरवर पडलेल्या डागांवर लावावी. थोड्या वेळानंतर ओलसर फडक्यानं फर्निचर पुसल्यास डाग निघून जातात.
2. दारांना लावलेले पितळी किंवा स्टीलचे हॅण्डल्स कळकट झालेले असतील तर केवळ पाण्यानं पुसून ते निघत नाहीत. यासाठी लिंबू आणि मीठ यांचा वापर करुन क्लीनर तयार करता येतं. लिंबू नसल्यास व्हाइट व्हिनेगरचा उपयोगही करता येतो. लिंबू आणि मिठाचं क्लीनर तयार करण्यासाठी एका भांड्यात लिंबाचा रस घ्यावा. त्यात मीठ घालावं. ते एकत्र करुन एका ओलसर कपड्यावर घेऊन त्यानं हॅण्डल्स आणि कडी कोयंडे हलक्या हातानं घासावे. थोड्या वेळ घासल्यानंतर कळकट झालेले हॅण्डल्स , कडी कोयंडे नव्यासार्खे चकचकीत होतात.
Image: Google
3. कपाटावरचा आरसा, ड्रेसिंग टेबलचा धुरकट झालेला आरसा , खिडक्यांच्या काचा स्वच्छ करण्यासाठी व्हाइट विनेगर, ॲपल सायडर व्हिनेगर यांचा वापर करुन क्लीनर तयार करता येते. यासाठी एक स्प्रे बाॅटल घ्यावं. त्यात अर्धा कप व्हिनेगर घ्यावं. त्यात 2 कप पाणी घालावं. कोणतंही इसेन्शियल ऑइल घ्यावं. हे सर्व नीट एकत्र करुन ते आरश्यावर आणि काचेवर फवारुन वर्तमानपत्राच्या कागदानं, टिश्यू पेपरनं किंवा स्वच्छ कपड्यानं पुसून घ्यावेत. आरसे आणि काचा चकचकीत होतात.
4. घरातल्या संगमरवरी फरशी किंवा भिंती स्वच्छ करण्यासाठी डिशवाॅशिंग लिक्विडच्या सहाय्यानं क्लीनर तयार करता येतं. यासाठी 2 कप गरम पाणी घ्यावं. त्यात थोडं डिशवाॅशिंग लिक्विड घ्यावं. त्यात साफसफाईसाठी वापरला जाणारा कपडा बुडवून तो थोडा पिळून घ्यावा आणि त्या कपड्यान्ं संगमरवरी फरशी आणि भिंती पुसल्या की लगेच स्वच्छ होतात. संगमरवरी फरशी स्वच्च करताना लिंबू किंवा व्हिनेगर या ॲसिडिक गोष्टींचा वापर करु नये. त्यामुळे दगड खराब होतो.