गणपतीचे १० दिवस आणि त्यात महालक्ष्मी किंवा गौरीचे ३ दिवस... अशी घरात दररोज पुजा होते. देवाला भरपूर फुले, हार, दुर्वा, आघाडा अर्पण केल्या जातात. पण आजची फुले आणि पत्री उद्या निर्माल्य होऊन जातात. गौरी- गणपतीचा सण झाल्यावर घरात एखादी पिशवी भरून तरी निर्माल्य तयार होते. हे निर्माल्य एखाद्या नदी पात्रात टाकण्याऐवजी त्यातली फुलं वेगळी काढा आणि घरच्याघरी त्याचा धूप तयार करा (How to make dhoop from flowers in nirmalya). निर्माल्याचा अशा पद्धतीने छान सुवासिक उपयोग केला तर ते आपल्या पर्यावरणासाठीही नक्कीच उपयोगी ठरेल (Best and ecofriendly reuse of nirmalya). अनेक जण निर्माल्यापासून खत तयार करतात. आता यावर्षी त्याच निर्माल्याचा हा आणखी एक प्रयोग करून पाहा. घर सुवासिक तर होईलच, पण घरात प्रसन्नही वाटेल.
निर्माल्यापासून धूप कसे तयार करायचे?
निर्माल्यातल्या फुलांचा वापर करून धूप कशा पद्धतीने तयार करायची याची कृती इन्स्टाग्रामच्या krishna_homedecor या पेजवर शेअर करण्यात आली आहे. यासाठी आपल्याला निर्माल्यातील फुले, कापूर, लवंग, लोबान, संत्र्याची सालं, मध आणि तूप हे साहित्य लागणार आहे.
गणपती- गौरीसाठी करा तांबूल, घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास पदार्थ, छानसा तांबूल वाढवेल रंगत
सगळ्यात आधी तर तुमच्याकडचे जे निर्माल्य आहे, त्यातून फुलं वेगळी काढून घ्या आणि ती थोडी स्वच्छ करून घ्या. फुलं धुवू नका. नुसतीच थोडी झटकून घ्या. त्यानंतर फुलांच्या पाकळ्या करा आणि त्या २ दिवस उन्हात वाळू द्या.
निर्माल्यातली जास्वंदाची फुलं सुकली म्हणून फेकू नका, केसांसाठी वापरा.. केस होतील मजबूत- लांबसडक
त्यासोबतच संत्र्याची सालेही वाळवून घ्या. संत्र्याची साले नसतील तर कडुलिंबाची पाने वाळवून घ्या. २ वाट्या फुलांच्या पाकळ्या असतील तर त्यात अर्धा ते पाऊण वाटी कडुलिंबाची पाने घ्या.
आता फुलांच्या वाळलेल्या पाकळ्या, कडुलिंबाची पाने, ८ ते १० लवंगा, पाव वाटी कापूर, अर्धी वाटी बाजारात मिळणारे लोबान हे सगळे एकत्रित मिक्सरमधून काढून घ्या आणि त्याची बारीक पावडर करा.
त्या पावडरमध्ये २ टेबलस्पून मध आणि तेवढेच तूप टाका. सगळे मिश्रण व्यवस्थित एकजीव करा आणि त्याचे छोटे छोटे धूपच्या आकाराचे गोळे करा. मिश्रण खूप कोरडं झाल्यासारखं वाटलं तर त्यात आणखी थोडा मध किंवा पाणी टाका. हा धूप घरातच एक- दोन दिवस वाळू द्या आणि नंतर वापरा.