संध्याकाळ झाली की घरात डास यायला सुरुवात होते. त्यामुळे अनेकदा आपण संध्याकाळच्या वेळी घराची दारं, खिडक्या लावून घेतो. मात्र एखादवेळी गडबडीत आपल्याकडून एखादे जरी दार उघडे राहीले तरी हे डास घरात येतात आणि नुसता धुमाकूळ घालतात. रात्री झोपायच्या वेळी तर हे डास आपल्याला चावून फोडून खातात. घराच्या आजुबाजूला असलेला कचरा, गवत आणि पाण्याची डबकी यांमुळे दिवसा आणि रात्रीही वेगवेगळ्या प्रकारचे डास आपल्या कानाशी सतत गुणगुणत असतात. डास चावले की आपल्याला नकळत त्याठिकाणी खाज सुटते, आग होते. मग तिथे खाजवल्यानंतर लाल फोड येतो आणि आपली चिडचिड व्हायला लागते. इतकेच नाही तर डास चावल्याने डेंगी, चिकनगुन्यासारखे गंभीर आजारांचे प्रमाणही वाढल्याचे मागील काही वर्षात आपण पाहत आहोत.
डास चावले की आपली झोपमोडही होते आणि त्यामुळे पुढचा पूर्ण दिवस आळसात किंवा कंटाळवाणा जातो. झोप नीट झाली नाही तर त्याचा आपल्या तब्येतीवर परीणाम होतो. यावर उपाय म्हणून आपण घरात इलेक्ट्रीक कॉईल लावतो किंवा रॅकेटने हे डास मारतो. पण हे सगळेच उपाय लहान मुले, ज्येष्ठ मंडळी यांच्या आरोग्यासाठी तितके सुरक्षित नसतात. लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरीकांना त्याच्या उग्र वासाने त्रास होण्याची शक्यता असते, रॅकेटनेही शॉक बसल्याचे आपण ऐकले असेल. अशावेळी घरच्या घरी करता येतील असे नैसर्गिक उपाय करता आले तर? म्हणूनच घरात उपलब्ध असणाऱ्या आणि आरोग्यासाठी चांगल्या अशा गोष्टींचा वापर करुन डासांपासून सुटका करुन घेण्याचा सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत.
१. कडूनिंबाची पाने बाजारात अगदी सहज उपलब्ध होतात. या पानांना आयुर्वेदाच्या दृष्टीने बरेच महत्त्व असून त्यामुळे श्वसनविकार, त्वचाविकार दूर होण्यास मदत होते.
२. एका मातीच्या भांड्यात ही पाने घालायची, ती थोडी वाळलेली असतील तरी ठिक आहे. यामध्ये तमालपत्राची २ पाने घालायची.
३. त्यात १० लहान आकाराच्या कापूराच्या वड्या, ७ ते ८ लवंग आणि मोहरीचे तेल घालायचे.
४. आपण दिवा लावतो त्याप्रमाणे काडेपेटीने हे पेटवायचे. सुरुवातीला हे थोडे जळते आणि मग त्याचा धूर व्हायला सुरुवात होते.
५. संध्याकाळी आपण घरात धूप, उदबत्ती लावतो त्याचप्रमाणे हा धूर घरात सगळीकडे पसरेल अशाप्रकारे फिरवायचा.
६. या उग्र वासाने आणि धुराने घरभर पसरलेले डास दूर होण्यास मदत होते.