Join us  

उन्हाळ्यात डास खूप चावतात, रात्रीची झोप उडाली? घरच्याघरी करा १ सोपा उपाय, पळवा डास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2023 1:39 PM

How To Make Natural and Safe Mosquito Repellent at Home : घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर करुन डासांपासून सुटका करुन घेण्यासाठी सोपा उपाय...

उन्हाळा सुरू झाला की नकळत डासांची संख्या वाढायला लागते आणि एरवी संध्याकाळच्या वेळी येणारे डास दिवसाही चावायला लागतात. घराच्या आजुबाजूला असलेला कचरा, गवत आणि पाण्याची डबकी यांमुळे दिवसा आणि रात्रीही वेगवेगळ्या प्रकारचे  डास आपल्या कानाशी सतत गुणगुणत असतात. डास चावले की आपल्याला आपल्याला नकळत त्याठिकाणी खाज सुटते. मग तिथे खाजवल्यानंतर लाल फोड येतो, त्याची आग होते आणि आपली चिडचिड व्हायला लागते. इतकेच नाही तर डास चावल्याने डेंगी, चिकनगुन्यासारखे गंभीर आजारांचे प्रमाणही वाढल्याचे मागील काही वर्षात आपण पाहत आहोत (How To Make Natural and Safe Mosquito Repellent at Home). 

डास हे केवळ झाडं, साचलेले पाणी किंवा कचरा यांमुळेच वाढतात असं नाही. तर हवेतील दमटपणामुळेही डासांचे प्रमाण वाढू शकते. याबरोबरच माश्यांचे प्रमाणही या दिवसांत वाढलेले असते. यावर उपाय म्हणून आपण घरात इलेक्ट्रीक कॉईल किंवा आणखी काही उपाय करतो. पण त्यामध्ये असणारे रासायनिक घटक आरोग्यासाठी चांगले असतेच असे नाही. लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरीकांना त्याच्या उग्र वासाने त्रास होण्याची शक्यता असते. अशावेळी घरच्या घरी करता येतील असे नैसर्गिक उपाय करता आले तर? म्हणूनच घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर करुन डासांपासून सुटका करुन घेण्याचा सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत. 

(Image : Google)

१. एका ताटलीमध्ये एक गोलाकार स्टँड ठेवा. 

२. त्यामध्ये ८ ते १० कडूनिंबाची पाने, २ तमालपत्र आणि ४ लवंगा घाला. 

३. यामध्ये कापूर आणि मोहरीचे तेल घाला. 

४. काडेपेटीची काडी लावून ती त्यामध्ये ठेवून द्या.

५. या मिश्रणाचा धूर होईल आणि एकप्रकारचा वासही येईल. 

६. घरात सगळीकडे आपण धूप ज्याप्रमाणे फिरवतो त्याप्रमाणे ही ताटली फिरवा. 

७. या नैसर्गिक गोष्टींमुळे डास निघून जातात आणि हवा शुद्ध होण्यास मदत होते. 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सआरोग्यसुंदर गृहनियोजन