Join us  

हिवाळ्यात काचेची भांडी तडकण्याची भीती वाटते?... एक सोपा उपाय... भांडी तडकून फुटणार नाहीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2023 6:19 PM

How To Prevent Glasses From Cracking In Winter Season : हिवाळ्यात काचेच्या ग्लास, मग, कप यांना तडा जाऊन फुटू नयेत म्हणून एक सोपा उपाय आपल्याला करता येऊ शकतो.

हिवाळ्यात आणि पावसाळ्यात जस जसा वातावरणातला गारठा वाढतो तसे आपल्याला काहीतरी गरमागरम प्यावेसे किंवा खावेसे वाटते. हिवाळ्यात थंडीचा पारा वाढला की आपल्याला गरमागरम चहा किंवा कॉफी पिण्याची तलप लागते. अशावेळी आपण घरातच मस्त गरम सूप, चहा किंवा कॉफी बनवून घेतो. हा गरम चहा, कॉफी किंवा सूप आपण छान काचेचा कप, कॉफी मग, बाऊल यांमध्ये ओतून मग त्याचा आनंद घेत घेत पितो. परंतु बऱ्याचदा थंडीमध्ये बाहेरच्या वातावरणातील गारठ्यामुळे आपण एखाद्या काचेच्या कपात, ग्लासात गरम पदार्थ ओतला तर अचानकपणे या काचेच्या ग्लासांना तडा जाऊन ते फुटण्याची शक्यता असते. अशावेळी नेमकं काय करायचं हे आपल्याला समजत नाही. अशाप्रकारे हिवाळ्यात काचेच्या ग्लास, मग, कप यांना तडा जाऊन फुटू नयेत म्हणून एक सोपा उपाय आपल्याला करता येऊ शकतो(How To Prevent Glasses From Cracking In Winter Season).

नक्की काय करता येऊ शकते? थंडीच्या दिवसात आपण काचेच्या भांड्यात गरम पदार्थ खासकरून द्रव स्वरूपातील पदार्थ ठेवले तर ही भांडी तडकून फुटण्याची शक्यता असते. अशावेळी ही काचेची भांडी फुटू नयेत म्हणून त्यात कोणताही गरम पदार्थ ओतताना एखादा स्टीलचा छोटा चमचा ठेवावा. हा स्टीलचा छोटासा चमचा काचेच्या भांड्यात ठेवून मगच गरम पदार्थ काचेच्या भांड्यात ओतावे. यामुळे तुमची काचेची भांडी अचानकपणे तडकून फुटत नाहीत. 

हिवाळ्यात काचेच्या भांड्यात गरम पदार्थ ओतल्याने या काचेच्या भांड्याना तडे जाऊन फुटण्याची शक्यता असते परंतु ही काचेची भांडी फुटू नयेत म्हणून नक्की कोणता सोपा उपाय करावा हे masterchefpankajbhadouria या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आले आहे. 

काय आहे यामागील वैज्ञानिक कारण...या उपायामागे एक वैज्ञानिक कारण आहे ते समजून घेऊयात. स्टील हा उष्णता वाहून नेणारा एक चांगला धातू आहे तर काच ही उष्णता वाहून नेऊ शकत नाही. परिणामी, काच हा उष्णतेचा खराब वाहक आहे. थंडीच्या दिवसात जेव्हा आपण एखाद्या काचेच्या भांड्यात गरम द्रव पदार्थ ओततो. तेव्हा त्या गरम पदार्थातील उष्णतेमुळे काचेच्या भांड्याचा आतील भाग हा वाफेमुळे गरम होतो. तसेच काचेच्या भांड्याच्या बाहेरील भाग हा संपूर्णपणे थंड असतो आणि याच कारणामुळे थंडीच्या दिवसात काचेच्या भांड्यात गरम पदार्थ ओतल्यात ते तडकून फुटतात किंवा त्यांना तडे जातात. खरंतर, स्टील हा उष्णतेचा चांगला वाहक असल्याने गरम पदार्थातील उष्णता तो शोषून घेतो परिणामी काचेच्या भांड्यात स्टीलचा चमचा ठेवल्याने थंडीत काचेची भांडी फुटत नाहीत.

टॅग्स :किचन टिप्सअन्न