कांदा हा आपल्या स्वयंपाकातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. कांद्याची ग्रेव्ही, चौकोनी चिरलेला कांदा, उभा चिरलेला कांदा अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण कांद्याचा वापर करतो. कधी फ्राय करुन कधी कच्चा तर कधी फोडणीत घालून चांगला परतून आपण कांदा परततो. नाश्ता, भाजी किंवा इतर कोणत्याही पदार्थासाठी आपल्याला बहुतांशवेळा कांदा लागतोच. पण कांदा कापायचा म्हटलं की डोळ्यातून घळाघळा पाणी येतं. त्यातही कांदा जास्तच ओला असेल तर फारच जास्त पाणी येतं. अशावेळी डोळ्यांची आगही होते आणि डोळे चुरचुरतात (How To Prevent Tears While Cutting Onions).
कांद्यामध्ये असलेले अमिनो अॅसिड म्हणजेच सल्फोऑक्साइड या रासायनिक घटकामुळे आपल्याला कांदा कापताना हा सगळा त्रास होतो. पण कांद्याला पर्याय नसल्याने आपल्याला तो कापण्याचे काम करावेच लागते. काहींना याचा कमी त्रास होतो तर काहींना जास्त. प्रसिद्ध शेफ पंकज भदौरीया यासाठी २ सोप्या टिप्स शेअर करतात. पंकज के नुसके यामध्ये त्या नेहमी स्वयंपाकाशी निगडीत काही ना काही सोप्या टिप्स शेअर करत असतात. आताही त्यांनी अशाच २ सोप्या ट्रिक्स शेअर केल्या असून त्या कोणत्या ते पाहूया..
१. कांदा कापताना आपण त्याची सालं काढतो, त्याप्रमाणे सालं काढून घ्यायची. त्यानंतर कांद्याचे पुढचे आणि मागचे देठ कापून घ्यायचे. मग मध्यभागी कापून कांद्याचे २ भाग करायचे. एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये कांद्याच्या कापलेल्या या २ फोडी घालायच्या. कांदा पाण्यात घातल्याने त्यातील रासायनिक घटक निघून जाण्यास मदत होते. ५ मिनीटांनी या फोडी बाहेर काढून त्यातील पाणी निथळून मग कांदा चिरायचा. यामुळे डोळ्यातून अजिबात पाणी येत नाही.
२. दुसरी ट्रिकही अतिशय सोपी आहे. कांदा कापताना तोंडात एखादे च्युइंगम ठेवायचे. हे च्युइंगम चघळत चघळत कांदा कापल्यास डोळ्यातून पाणी येत नाही. बाजारात विविध प्रकारची बरीच च्युइंगम मिळतात. यातले तुम्हाला आवडेल ते कोणतेही च्युईंगम तुम्ही तोंडात ठेवून चघळू शकता.