आपल्यापैकी काहीजणांना डोळयांच्या समस्या असतात असे लोक बहुतेकवेळा चष्म्याचा वापर करतात. ज्यांना अगदीच चष्म्याशिवाय दिसत नाही त्यांना नेहमी चष्मा लावावा लागतो. तरीही अनेकांना ते स्वच्छ करण्याची योग्य पद्धत माहीत नसते. अशा परिस्थितीत चष्मा साफ करताना लेन्सवर ओरखडे पडतात आणि त्यामुळे वर्षातून अनेक वेळा चष्मा बदलावा लागतो. चष्मा स्वस्त ते महाग अशा सर्व श्रेणींमध्ये उपलब्ध असले तरीही, आपला चष्मा खराब झाला तर नवीन चष्मा हा घ्यावाच लागतो.
मोबाईल, टीव्ही आणि कम्प्युटर तसेच लॅपटॉप यामुळे अलीकडे स्क्रीन टाईम वाढत चालला आहे. स्क्रीन टाईम वाढल्याने अनेकांना डोळ्यावर चष्मा घालण्याची वेळ येत आहे. चष्मा म्हटलं की त्याची सतत काळजी घ्यावी लागते. खास करून ज्यांना मोठा नंबरचा चष्मा आहे त्यांना चष्म्याशिवाय एखादं काम करणं शक्य होत नाही. अशांना तर कायम सोबत चष्मा बाळगणं आणि त्याचा सांभाळ करणं मोठं जिकिरीचं काम असतं. सतत घातला जाणारा चष्मा हा धूळ आणि घाम यांच्या संपर्कात येतो त्यामुळे त्यावर अनेकदा बॅक्टेरिया जमा होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच चष्मा वेळोवेळी स्वच्छ करणे देखील तितकच गरजेचे असते(How to Properly Clean your Eyeglasses Without Damaging Them).
चष्म्यावरील धूळ कशी स्वच्छ करावी....
चष्मा स्वच्छ करण्यासाठी क्लिनर असणं गरजेचं नाही यासाठी साधं पाणी देखील पुरेसं आहे तुम्ही थेट चष्मा नळाखाली पकडून त्यावर पाण्याचे काही थेंब टाकावे. त्यानंतर हलक्या हाताने चष्म्याच्या काचा आणि त्याच्या आजूबाजूची फ्रेम स्वच्छ करावी. त्यामुळे चष्म्यावरील डाग, चिकटपणा आणि बॅक्टेरिया निघून जाईल. त्यानंतर चष्म्या सोबत मिळालेल्या छोट्या कापडानेच कायम तो स्वच्छ कोरडा पुसावा यासाठी इतर कोणतही कापड वापरू नये. चष्मा स्वच्छ करण्यासाठी ट्यूश्यु पेपर, टॉवेल, हात रुमाल किंवा ओढणीचा वापर करू नये. तसचं काहीजण नेलपेंट रिमूव्हरचा वापर चष्मा स्वच्छ करण्यासाठी वापरतात मात्र यामुळे चष्म्याची काच खराब होवू शकते.
किचन कॅबिनेट- ट्रॉल्यांची दारं तेलकट-चिकट झाली? २ सोपे उपाय, कॅबिनेट चमकेल नव्यासारखं...
चष्मा कसा स्वच्छ करावा ?
१. मायक्रोफायबर कापडाने कोरडे करा :- मायक्रोफायबर कापड हे लिंट फ्री असते, त्यामुळे पुसताना लेन्सवर स्क्रॅचच्या खुणा उमटत नाहीत. यासाठी एकदा चष्मा सौम्य साबणाने धुवून ते सुकविण्यासाठी मायक्रोफायबर कापडाचा वापर करावा.
२. लिक्विड सोपचा वापर करावा :- चष्मा स्वच्छ करण्यासाठी लिक्विड सोपचे काही थेंब बोटांवर घेऊन हलक्या हाताने लेन्स स्वच्छ करा. त्यानंतर मायक्रोफायबरचं कापडं किंवा चष्म्याचा रुमाल थोडा ओला करून चष्मा स्वच्छ पुसावा. चष्मा धुण्यासाठी कोमट पाणी वापरावं जास्त गरम पाण्याचा वापर करू नये. यामुळे लेन्सवरील कोटिंग खराब होवू शकते.
३. सॅनिटायझरचा करा वापर :- अधून मधून किंवा तुम्ही बाहेरून आल्यावर चष्मा सॅनिटाइज करणं गरजेचं आहे. मात्र हे करत असताना चष्म्यावर सॅनिटाइजर टाकून ठेवू नका. सॅनिटायजर लावून चष्मा लगेचच कोरडा करून घ्यावा नाहीतर लेन्सवर डाग राहण्याची शक्यता असते.
चष्मा बराच काळ स्क्रॅचमुक्त कसा ठेवायचा....
चष्माच्या लेन्सला स्क्रॅच मार्क्सपासून संरक्षित करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो चष्मा त्याच्या केसमध्ये ठेवणे. प्रत्येक वापरानंतर चष्मा इतर कोणत्याही ठिकाणी ठेवणे टाळा. चष्मा स्वच्छ करण्यासाठी काहीजण तोंडाची वाफ चष्म्याच्या काचेवर मारुन ती स्वच्छ करतात. यामुळे जर्म्स आणि बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता जास्त असते. चष्म्याला कायमच देण्यात आलेल्या बॉक्स कव्हरमध्ये ठेवावं. यामुळे तो सुरक्षित राहतो. तसचं दररोज घालण्यापूर्वी चष्मा स्वच्छ करण्याची काळजी घ्या. चष्मा स्वच्छ करताना केवळ काचा किंवा लेन्स स्वच्छ न करता. संपूर्ण पणे तो स्वच्छ करावा.