Join us

उन्हाळ्यात शूजला अत्यंत घाणेरडा वास येतो, बुटांची ही दुर्गंधी कशी टाळता येईल- वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 19:10 IST

Lifestyle Tips: लोक शूज आणि पायांची दुर्गंधी दूर करण्याचे उपाय शोधत असतात. आज आम्ही तुम्हाला ही समस्या दूर करण्याचे तीन उपाय सांगणार आहोत.

Lifestyle Tips: उन्हाळ्यात शूज घातल्यावर पायांना खूप जास्त घाम येतो. अशात घामामुळे बॅक्टेरिया तयार होतात आणि त्यामुळे शूज व पायांमधून दुर्गंधी येऊ लागते. अशात बरेच लोक उन्हाळ्यात शूज घालणं टाळतात. पण काही लोकांना शूज घालणं गरजेचंही असतं. ऑफिसला जाणं असो, रनिंगला जाणं असो शूज वापरावेच लागतात. अशात लोक शूज आणि पायांची दुर्गंधी दूर करण्याचे उपाय शोधत असतात. आज आम्ही तुम्हाला ही समस्या दूर करण्याचे तीन उपाय सांगणार आहोत.

शूजमध्ये ठेवा कापराचा तुकडा

जर तुमच्या शूजमधून घामाची खूप जास्त दुर्गंधी येत असेल तर रात्री झोपण्याआधी जेव्हाही शूज काढता तेव्हा त्यात कापराचा एक छोटा तुकडा ठेवा. कापराचा तुकडा कागदाने किंवा सॉक्सने कव्हर करा. कापरामुळे दुर्गंधी दूर करण्यास मदत मिळते. सकाळी तुम्हाला शूजची दुर्गंधी पूर्ण गेल्याचं दिसेल.

तेजपत्त्याचा करा वापर

वेगवेगळ्या भाज्यांमध्ये तेजपत्त्याचा वापर केला जातो. या पानाचा वापर तुम्ही दुर्गंधी दूर करण्यासाठीही करू शकता. तेजपत्त्याने शूजची घामाची दुर्गंधी दूर करण्यासही मदत मिळते. यासाठी शूजमध्ये तेजपत्ता ठेवा ते कागद किंवा सॉक्सने कव्हर करा. जेणेकरून तेजपत्त्याचा सुगंध शूजमध्ये पसरेल.

डांबराची गोळी

नेप्थलीन बॉल म्हणजेच डांबराच्या गोळीचा वापर जास्तकरून कपड्यांच्या कपाटात, बाथरूममध्ये, सिंकमध्ये केला जातो. याने दुर्गंधी दूर करण्यास मदत मिळते. एक छोटी डांबराची गोळी शूजमध्ये ठेवाल तर याने घामाची दुर्गंधी येणार नाही.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स