धुलीवंदनाला आपल्याकडे मोठ्या प्रमाणात रंग खेळले जातात. बरेचदा रंग खेळायचे म्हणून आपण जुने कपडेच घालतो. पण काही वेळा ऑफीसमध्ये किंवा घरी असतानाही आपल्या नकळत नातेवाईक, मित्रमंडळी किंवा शेजारीपाजारी आपल्याला रंग लावायला येतात. अशावेळी आपण नेहमीच्या किंवा चांगल्या कपड्यांमध्ये असतो. कपड्यांना एकदा रंगाचे डाग लागले की ते काही केल्या निघत नाहीत. मग हे कपडे घरात वापरावे लागतात किंवा चक्क टाकून द्यावे लागतात. महागडे कपडे असतील तर मात्र आपला जीव वरखाली होत राहतो. आता या कपड्यांवरचे डाग काढण्यासाठी नेमकं काय करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर पाहूया काही सोपे उपाय (How To Remove Holi Colors From Cloths)...
१. विंडो क्लीनर
विंडो क्लीनर आपण खिडक्या साफ करण्यासाठी वापरतो. पण ते स्ट्रॉंग असल्याने त्याने डाग झटपट निघण्यास मदत होते. त्यामुळे कपड्यांवर ज्याठिकाणी रंगाचे डाग आहेत त्याठिकाणी विंडो क्लीनर मारुन १५ ते २० मिनीटांसाठी कपडे तसेच ठेवा. फक्त हा क्लीनर अमोनिया बेस्ड असेल असे पाहा. त्यानंतर आपण नेहमी कपडे धुतो त्याप्रमाणे कपडे धुवून टाका. तरीही डाग जात नसतील तर रोज याचपद्धतीने कपडे धुवा. यामुळे कपड्यांवरचे डाग निघून जाण्यास नक्कीच मदत होईल.
२. ब्लीच
पांढऱ्या कपड्यांवर लागलेले रंग काढणे काहीसे अवघड काम असते. पांढऱ्या कपड्यांवर रंग लगेच शोषले जातात. अशावेळी अर्ध्या बादली गरम पाण्यात नॉन-क्लोरीन ब्लीच घाला. मग त्यामध्ये कपडे भिजवा आणि काही वेळाने हे कपडे नेहमीप्रमाणे धुवून वाळवा. यामुळे पांढऱ्या कपड्यांवरचा रंग जाण्यास निश्चितच मदत होईल.
३. लिंबाचा रस
लिंबामध्ये सायट्रीक अॅसिड असल्याने रंगाचे डाग काढण्यासाठी लिंबू अतिशय फायदेशीर ठरते. एका वाटीत डीटर्जंट पावडर आणि लिंबाचा रस घालून घट्टसर पेस्ट तयार करा. ज्याठिकाणी कपड्यांवर डाग पडले आहेत अशाठिकाणी ही पेस्ट लावून १५ मिनीटे तशीच राहू द्या. १५ मिनीटांनी हलक्या हाताने स्क्रब करा आणि नेहमीप्रमाणे कपडे धुवा. यामुळे कपड्यांवरचे डाग फिकट होण्यास मदत होईल.