उन्हाळा सुरु झाला की आंब्याचे वेध लागतात. कधी एकदा घरी आंबा आणतो आणि तो खातो असं होऊन जातं. प्रत्येक आंबा येण्याचीही वेळ असते. त्यात सगळ्यात आधी आगमन होतं ते कोकणचा राजा हापूसचं (Hapus mango).. सुरुवातीला हापुसचे भाव पण खूप जास्त असतात. तरीही आंबा खाण्याचा मोहच एवढा असतो की भरपूर पैसे मोजून हापूसची पेटी आणली जाते. त्यातले पिकलेले आंबे कमी आणि कच्चेच जास्त असतात. आता या हापूससाठी मोजलेले पैसे पुरेपुर वसूल करायचे असतील तर कच्च्या आंब्यांना व्यवस्थित पिकवणं हे मुख्य काम. (ripening mango at home)
म्हणूनच तर हापूस असो किंवा इतर कोणताही कच्चा आंबा असो. प्रत्येकाला पिकविण्याची पद्धत सारखीच असते. घरी नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवताना त्यांचं तापमान व्यवस्थित राखलं जाणं अतिशय गरजेचं असतं. ते कसं राखायचं हे जमलं की अर्ध काम फत्ते झालं.. यंदा अर्धे कच्चे आंबे घरीच पिकविण्याचा विचार असेल तर या काही टिप्स नक्की फॉलो करा. आंबे सडणार नाहीत. छान पिकतील, सगळे आवडीने खातील.
घरी आंबा पिकत घालताना लक्षात ठेवा या गोष्टी- आंब्याची अढी कधीही थेट जमिनीवर लावू नये. अढी लावण्यासाठी बांबुच्या दुरड्या वापरा किंवा मग जमिनीवर सरळ एखादी घोंगडी अंथरा.- घोंगडी अंथरल्यानंतर त्यावर थोडे पाचट (वाळलेले गवत किंवा आंब्याच्या पेटीत जो भुसा असतो तो) टाका. - त्यावर आता आंबे एकमेकांना चिटकून ठेवा. आंबे ठेवताना जो आंबा थोडा खराब किंवा मार लागलेला वाटतोय, तो आधीच बाजूला काढून घ्या.- मार लागलेल्या आंब्यांची वेगळी अढी लावा. जेणेकरून त्यांच्यामुळे इतर आंबे खराब होणार नाहीत.- आंबे ठेवताना दोन आंब्यांची देठं कधीही एकमेकांसमोर येतील अशी ठेवू नका.
- आंबे ठेवून झाले की त्याच्या मध्ये- मध्ये कांदे ठेवा. कांदा ठेवल्यास आंबा अधिक चांगला पिकतो.- आता वरून पुन्हा एकदा पाचट टाका. त्यावर वर्तमानपत्र झाकून टाका.- त्यावरून एखादे ब्लँकेट किंवा चादर झाकून टाका. - दररोज ही अढी काढा, आंब्याची बाजू बदलून घ्या आणि पिकलेले आंबे बाजूला काढत चला. - अशा पद्धतीने अढी लावली तर जास्तीतजास्त आंबे उत्तम पिकतील हे नक्की.