आपल्या किचनमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी वेगवेगळे तव्यांचे प्रकार वापरतो. लोखंडी, हार्ड अॅनोडाइझ्ड, अॅल्युमिनियम, नॉनस्टिक पॅन, ब्लॅक कोटेट तवा, बिड्याचा तवा असे अनेक प्रकारचे पॅन, तवे आपण वापरतो. या काही ठराविक वैशिष्ट असणाऱ्या भांड्यांची तितकीच जास्त स्वच्छता व काळजी घ्यावी लागते. लोखंडी बिड्याचा तवा आपण दररोजच्या जेवण बनविण्यासाठी वापरत नाही. लोखंडी बिड्याचा तवा वापरुन झाल्यानंतर त्याची योग्य ती स्वच्छता व काळजी घ्यावीच लागते.
बीडाचा तवा बाजारातून आणल्यावर तो वापरण्याआधी त्याला स्वच्छ धुवून व्यवस्थित सिझन करावे लागते. काहीवेळा बिड्याचा लोखंडी तवा व्यवस्थित सिझन झाला नाही तर त्यावर पदार्थ बनवताना ते चिटकण्याची जास्त शक्यता असते. म्हणून या लोखंडी बिड्याच्या तव्याची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. लोखंडी बिडाच्या तव्याला स्वयंपाकयोग्य करण्यासाठीची सिझन पद्धत काय आहे ते समजून घेऊयात (How To Seasoning Cast Iron ,Pan, Kadai, Tawa,)
बिडाचा तवा स्वयंपाक योग्य कसा करावा ?
१. बीडाचा तवा बाजारातून आणल्यावर त्याला स्वच्छ धुवून घासणीने घासून घ्या. ( हे सर्व करताना हॅन्डग्लोव्ह्ज घालायला विसरू नका).
२. तवा धुवून - पुसून कोरडा करुन घ्या (१ ते २ मिनिटे तवा गरम केला तर लगेच कोरडा होईल).
३. तव्याला सर्व बाजूने तेल लावून १ दिवस तसाच ठेऊन द्या.
४. दुसऱ्या दिवशी तवा मोठ्या आचेवर ठेवून गरम करुन घ्या, मग त्यामधे ५-६ चमचे तेल आणि ४ चिरलेले कांदे घालून भाजून घ्या.
५. तो कांदा आणि ते तेल मात्र स्वयंपाकात उपयोगाला आणायचे नाही कारण त्यात लोखंडाची खर असते.
६. कांदा करपला की टिश्यूने तवा पुसून त्याला परत तेल लावून ठेऊन द्या.
७. असे ४-५ दिवस करा.
८. बिडाचा तवा जर नीट सिझन केला असेल तर तेल पीत नाही.
९. ही पद्धत वापरून आपण आपला बीडाचा तवा सिझन करु शकतो.
nutribit.app या इंस्टाग्राम पेजवरून बीडाचा तवा स्वयंपाकयोग्य कसा करायचा? याबद्दलचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
बिडाच्या तव्याच्या बाबतीत काही खास टीप्स लक्षांत ठेवा :-
१. नवीन तवा असेल तर पहिले १-२ डोसा , घावणे हे चिकटतातच. प्रत्येक घावणे घालताना बिड्याला तेल लावा, डोसा तव्यावर घातल्यावर त्याच्याभोवती गोलाकार आकारात तेल सोडा.
२. जसे जसे वापर जास्त होईल तसा तवा लवकर नॉन स्टिक बनेल.
३. बिड्याचा तवा वापरुन झाला की धुवून कोरडा करुन लगेच तेल लावून ठेऊन द्या.
४. जर तव्याला गंज आला असेल तर घासणीने घासून सगळा गंज काढून घ्या. गॅस वर गरम करुन त्याला तेल घालून १० मिनिटे गरम करुन घ्या. नंतर पुसून ठेऊन द्या.