सिताफळ हे अनेकांच्या आवडीचे फळ. अतिशय मधुर लागणारे हे फळ चवीलाही अतिशय छान असते. कॅल्शियम आणि भरपूर व्हिटॅमिन्सचा खजिना असलेले हे फळ आवर्जून खायला हवे असे सांगितले जाते. सिताफळात लोह, कॅल्शियम मॅग्नेशियम, फॉस्फरस हे घटक असल्याने हाडांसाठी हे फळ अतिशय फायदेशीर असते. सिताफळामध्ये अँटीऑक्सिडंटसचे प्रमाण जास्त असल्याने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच प्रतिकारशक्ती वाढण्याच्या दृष्टीने हे फळ फायदेशीर ठरते. सिताफळामध्ये व्हिटॅमिन बी ६ असते जे ब्रोन्कियल इन्फेक्शनपासून दूर ठेवण्यास मदत करते. त्यामुळे दम्याचा त्रास असणाऱ्यांनी आवर्जून सिताफळ खायला हवे. पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करत असल्याने हृदयविकार असलेल्यांनी सिताफळ खायला हवे (How To Separate Sitafal Custard Apple pulp from Sitafal Easy and Simple Trick).
वर्षातील २ ते ३ महिनेच हे फळ मुबलक प्रमाणात मिळत असल्याने इतर वर्षभर आपण या फळाचा आस्वाद घेऊ शकत नाही. अशावेळी आपण सिताफळ रबडी, सिताफळ आईस्क्रीम, मिल्कशेक असे काही ना काही खाऊन हे फळ खाण्याची इच्छा पूर्ण करतो. आता रबडी किंवा आईस्क्रीममध्ये हे फळ घालायचे म्हणजे याच्या बिया काढण्याचे काम आले. एरवी फळ खाताना आपण गर चोखून घेतो आणि मग बिया बाहेर काढून टाकतो. पण या पदार्थांमध्ये सिताफळ घालायचे असेल तर त्याचा गर कसा काढायचा असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल. तर आज आपण सिताफळाचा गर तोही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसा काढायचा ते पाहूया.
१. सिताफळाचे २ भाग करायचे आणि चमच्याने त्याच्या मधल्या बिया आणि गर काढून घ्यायचा.
२. कांदा किंवा कोणत्याही भाज्या बारीक करण्यासाठी आपण हाताने दोरी ओढण्याचा एकप्रकारचा चॉपर वापरतो. त्यामध्ये हा गर घालायचा आणि नेहमीप्रमाणे ही दोरी ओढायची.
३. मध्यभागी असलेल्या ब्लेडच्या जवळ या बियांतून निघालेला गर जमा होतो आणि बिया बाजूला जमा होतात.
४. या बिया हाताने किंवा चमच्याने वेगळ्या करण्याचे काम आपल्याला करावे लागते पण चॉपरमुळे हे काम खूपच सोपे होते.
५. गर एका बाजूला जमा झाल्याने बासुंदी, आईस्क्रीम किंवा रबडी बनवण्यासाठी आपण या गराचा अतिशय सहज वापर करु शकतो.