Join us  

चाकू-सुरीची धार गेल्याने स्वयंपाकाला वेळ लागतो? ५ मिनीटांत सुरीला धार लावण्याची सोपी ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2023 11:54 AM

How to Sharpen a Knife Easily at Home : प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया एक अगदी सोपी आणि महत्त्वाची ट्रिक आपल्याशी शेअर करतात.

स्वयंपाकघरात भाज्या, फळं चिरण्यासाठी आपल्याला सतत हाताशी विळी किंवा सुरी लागते. आजकाल विळी वापरण्याचे प्रमाण कमी झाले असून सुरी किंवा चाकूचा वापर वाढला आहे. स्वयंपाक करताना आपल्याला सतत हाताशी सुरी लागते. ही सुरी चांगली धारधार असेल तर आपले काम झटपट होते. नाहीतर ५ मिनीटांच्या कामात १० ते १५ मिनीटे जातात आणि आपल्याला हवे तसे चिरले जात नसल्याने आपलीही चिडचिड होते. वापरुन वापरुन बोथट झालेल्या अशा सुऱ्या काहीच उपयोगाच्या नसतात. 

बरेचदा आपल्या किचनमध्ये २-३ सुऱ्या असतात पण एकाही सुरीला नीट धार नसल्याने त्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही. अशावेळी धार गेलेली सुरी एकतर बाहेरुन धार लावून आणावी लागते. नाहीतर टाकून देऊन नवीन सुरी खरेदी करावी लागते. या दोन्ही गोष्टींपेक्षा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण सुरीला धार लावू शकतो, तेही अगदी ५ मिनीटांत. त्यासाठी प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया एक अगदी सोपी आणि महत्त्वाची ट्रिक आपल्याशी शेअर करतात. पंकज के नुस्खे या खास शोमध्ये त्या ही ट्रीक कोणती आणि ती कशी करायची याविषयी सांगतात(How to Sharpen a Knife Easily at Home)...

(Image : Google)

 १. यासाठी आपल्याला फक्त थोड्या मोठ्या आकाराच्या चिनी मातीच्या कॉफी मगची आवश्यकता असते. 

२. साधारणपणे आपल्या घरात असा एखादा तरी कॉफी मग नक्की असतो. हा कप उलटा ठेवायचा आणि त्यावर सुरीला धार करायची.

३. सुरीला सुमारे 45-अंशाच्या कोनात धरायचे आणि कपच्या तळावर सुरी एकसारखी घासायची. 

४. 5-7 मिनिटे सलग हे केल्यास सुरीला धार लागण्यास मदत होईल. सिरॅमिकवर मेटल घासल्याने अशाप्रकारे सुरीला चांगली धार येते. 

५. सुरीला धार झाली आहे याचा अंदाज घेऊन नंतर ही सुरी गरम पाण्यात धुवायची आणि वापरुन पाहायची. 

६. हा सोपा आणि झटपट होणारा उपाय आपण अगदी सहज केव्हाही करु शकतो. त्यामुळे आपली धार गेलेली सुरी धारधार होण्यास मदत होते. 

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.