मिक्सर ही स्वयंपाकघरात नियमित वापरली जाणारी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. दाण्याचा कूट बारीक करणे, एखाद्या भाजीसाठी ग्रेव्ही करणे किंवा अगदी झटपट एखादी चटणी फिरवण्यासाठी आपण सगळेच सर्रास मिक्सर वापरतो. पूर्वी मिक्सर नव्हता तेव्हा सगळे हाताने वाटण्याची पद्धत होती. पण मिक्सरचा शोध लागला आणि घरोघरी तो वापरला जाऊ लागला. घाईच्या वेळी स्वयंपाकाचे काम लवकर व्हावे यासाठी मिक्सर अतिशय उपयुक्त असून महिला सर्रास याचा वापर करतात. हे जरी ठिक असले तरी यंत्र असल्याने काही काळाने ते जुने होते आणि त्यामध्ये बिघाड होण्याची शक्यता असते (How To Sharpen Mixer Bled at Home).
वापरुन वापरुन मिक्सरचे भांडे खराब होते, कधी झाकणाचे रबरच तुटते तर कधी मिक्सरच्या आतल्या ब्लेडची धार गेल्याने आपले काम व्यवस्थित होत नाही. मिक्सरच्या भांड्याला आतून असणारे ब्लेड बोथट झाल्याने बरेचदा आपण कितीही फिरवले तरी आतले पदार्थ नीट बारीक होत नाहीत. ऐन घाईच्या वेळी ग्रेव्ही किंवा कूट, खोबरं नीट बारीक न झाल्याने एकतर आपली चिडचिड होते किंवा पदार्थ चुकतो. मग यासाठी मिक्सरच्या ब्लेडला धार लावून आणणे आवश्यक असल्याचे आपल्या लक्षात येते. आता ही धार लावण्यासाठी आपल्याला भांडे रिपेअरींगच्या दुकानात नेऊन द्यावे लागते. असे करण्यापेक्षा घरच्या घरी मिक्सरच्या ब्लेडला धार लावता आली तर? प्रसिद्ध शेफ पंकज भदौरीया यांनी यासाठी एक अतिशय सोपी ट्रीक सांगितली आहे. पंकज के नुसके या माध्यमातून त्या नेहमीच काही ना काही उपयुक्त टीप्स शेअर करत असतात. आता हा सोपा उपाय काय आहे ते पाहूया...
अशी लावा मिक्सरच्या ब्लेडला धार...
मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये १ कप साधे मीठ घालायचे. मीठ घातल्यावर मिक्सरचे झाकण लावून १ मिनीटासाठी मिक्सर फिरवायचा. त्यानंतर हे मीठ बारीक होईल मात्र ते फेकून देण्याची गरज नाही. आपण त्याचा स्वयंपाकात वापर करु शकतो. पण यामुळे मिक्सरचे बोथट झालेले ब्लेडस धारधार व्हायला मदत होईल. त्यामुळे तुमच्याही मिक्सरचे ब्लेड बोथट झाले असतील तर घरच्या घरी अगदी सहज करता येणारा हा सोपा उपाय नक्की करुन पाहा.