मिक्सर ही स्वयंपाक घरातली अतिशय उपयुक्त वस्तू. झटकन मिक्सर फिरवलं आणि आपल्याला पाहिजे तो पदार्थ पटकन आपल्याला हवा तेवढा बारीक केला की कसं काम फटाफट होतं. पण यातच नेमकी गडबड होत असेल म्हणजे कितीदाही मिक्सर फिरवून आपल्याला हवा तेवढा बारीक, सफाईदारपणे एखादा पदार्थ वाटला जात नसेल, तर मात्र सगळाच गोंधळ उडतो. मिक्सरची एक- दोन- तीन अशी स्पीड वाढवून आपण वैतागून जातो पण तरीही पदार्थाला आपल्याला अपेक्षित असणारा गुळगुळीतपणा येत नाही. याचं कारण म्हणजे मिक्सरच्या भांड्याच्या ब्लेडची धार (sharpness of mixer blade) कमी होणं. घरच्याघरी चाकू, विळी यांना जशी आपण धार लावतो, तशाच पद्धतीने मिक्सर भांड्याच्या ब्लेडलाही धार लावता येते. त्यासाठीच तर बघा या सोप्या ट्रिक्स आणि टिप्स.(Tips and Tricks to sharp mixi blades)
मिक्सरच्या ब्लेडची धार कमी का होते? (why mixer blades becomes less sharp?)
- मिक्सरच्या भांड्याची काळजी योग्य पद्धतीने घेतली गेली नाही किंवा मग मिक्सर वापरताना वारंवार चुका होत गेल्या तर त्याचा परिणाम ब्लेडची धार कमी होण्यावर होतो.
- यासाठी मिक्सरचं भांडं कधीही खूप वेळ ओलं ठेवू नये. पदार्थ वाटून झाल्यानंतर अनेक जणी मिक्सरचं भांडं तसंच ठेवतात. किंवा मग तो वाटलेला पदार्थ भांड्यात चिटकून राहू नये यासाठी भांड्यात पाणी घालून ते बराच वेळ तसंच ठेवतात. अशा कोणत्याही कारणाने जर भांड्यातली ब्लेड वारंवार ओली राहात असेल तर तिची धार लवकर कमी होते.
- खूप घाई असताना पदार्थ पटापट वाटून व्हावा म्हणून मिक्सर सुरू केल्या केल्या जर ते लगेच दोन- तीन अशी स्पीड वाढवत नेत असाल तर त्यामुळे देखील ब्लेड खराब होऊ शकते. त्यामुळे काही सेकंद एकवर, नंतर दोनवर त्यानंतर सावकाश तीन वर अशाच पद्धतीने मिक्सरचा स्पीड वाढवावा.
- मिक्सरमध्ये वाटायचा पदार्थ नेहमी रुम टेम्परेचरवर असावा. खूप गरम पदार्थ वारंवार त्यात बारीक करत असाल तर धार खराब होऊ शकते.
मिक्सरच्या भांड्यातल्या ब्लेडला धार लावण्यासाठी...
१. हा उपाय करण्यासाठी मिक्सरची ब्लेड स्क्रू सैल करून भांड्यातून काढून घ्या. आता सॅण्ड पेपरचा एक छोटासा तुकडा बाजारातून विकत आणा. तुमच्या जवळच्या कोणत्याही हार्डवेअर दुकानात सॅण्ड पेपर अगदी स्वस्त मिळू शकतो. सॅण्ड पेपर खालून- वरून ब्लेडवर घासावा. व्यवस्थित जोर पडावा यासाठी ब्लेड एखाद्या सपाट पृष्ठभागावर किंवा ओट्यावर ठेवा. १० ते १५ मिनिटे व्यवस्थित सॅण्डपेपर घासल्यावर ब्लेडची धार वाढेल.
२. सॅण्डपेपर मिळतच नसेल तर त्याऐवजी एखादा लोखंडाचा रॉड, चंदनाचं खोड उगाळण्यासाठी देवघरात असलेली सहान किंवा मग प्युमिक स्टोनचा वापरही करता येतो.
३. मिक्सरच्या भांड्याच्या ब्लेडची धार कमी होऊ नये, यासाठी महिन्यातून एकदा भांड्यामध्ये अर्धी वाटी मीठ टाका. एखादा मिनिट ते मिक्सरमधून फिरवा. हा उपाय नियमित केल्यास मिक्सरची ब्लेड कायम धारदार राहते.