कोणत्याही पदार्थावर हिरवीगार कोथिंबीर असेल की तो पदार्थ खायला छान वाटतो. त्याला एकप्रकारचा स्वाद तकर येतोच पण कोथिंबीरीमुळे त्याची पौष्टीकताही वाढते. एरवी ही कोथिंबीर भरपूर टिकते पण उन्हाळा किंवा पावसाळ्याच्या दिवसांत ती लगेच सुकून जाते. बरेचजा पावसाळ्यात तर ओलसरच कोथिंबीर विकतात त्यामुळे ती निवडून ठेवली तरी एखाद्या ठिकाणी ओलावा राहीला की सगळीच कोथिंबीर काळी पडते आणि मग फेकून द्यावी लागते. यामुळे पैसे तर वाया जातातच पण कोथिंबीरही वाया जाते (How To Store Coriander 1 simple Trick).
बाजारातून सतत या गोष्टी विकत आणणे शक्य नसल्याने आपण साधारण आठवड्याभराची भाजी एकत्र आणून फ्रिजमध्ये साठवून ठेवतो. मात्र सध्या त्याचाही विशेष उपयोग होत नसून हवेतील बदलामुळे पालेभाज्या लवकर खराब होतात. भाजीपाला दिर्घ काळ चांगला टिकावा यासाठी तो कसा साठवून ठेवायचा हे आपल्याला माहिती असायला हवं. आज आपण कोथिंबीर साठवण्याची १ सोपी ट्रिक पाहणार आहोत. ज्यामुळे बाजारातून आणलेली कोथिंबीर आपण पुढे १५ दिवस टिकवून वापरु शकतो. पाहूया ही ट्रिक नेमकी काय आहे...
१. सुरुवातीला कोथिंबीर चांगली निवडून घ्यायची. यामध्ये आपण कोवळ्या काड्या घेऊ शकतो.
२. मग एका पातेल्यात चांगले पाणी घेऊन त्यात कोथिंबीर बुडवायची आणि स्वच्छ धुवून काढायची.
३. ओलसर असलेली ही कोथिंबीर चांगली निथळून एका मोठ्या ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये पसरुन ठेवायची.
४. २ ते ३ तास ही कोथिंबीर चांगली कोरडी झाल्यानंतर एका टॉवेलमध्ये हलकी बांधून ही कोथिंबीर डब्यात आणि मग फ्रिजमध्ये ठेवायची.
५. यामुळे थोडे पाणी उरले असेल तर ते टॉवेलमध्ये मुरते आणि बाहेरची हवा न लागल्याने कोथिंबीर बराच काळ फ्रिजमध्ये छान टिकते.
६. आवश्यकतेनुसार कोथिंबीर काढून स्वच्छ धुवायची आणि चिरुन पदार्थावर वापरायची.