आपण साधारणपणे सहा महिन्याचा किंवा वर्षाचा किराणा भरतो. इतर सामान आपण महिन्याचे महिन्याला आणत असलो तरी किमान धान्य जास्त लागत असल्याने आपण त्याची साठवणूक करतो. यात गहू, ज्वारी, तांदूळ, डाळी यांचा समावेश असतो. जुना तांदूळ जास्त चांगला म्हणून आपण जास्तीचा घेऊन ठेवतो. पण ओलाव्यामुळे किंवा आणखी काही कारणाने तांदूळ लवकर खराब होतात. मग त्यांना पोरकिडे होणे, आळ्या होणे, जाळी लागणे अशा काही ना काही समस्या निर्माण होतात. म्हणून तांदूळ आणल्यावर आपण त्यामध्ये बोरीक पावडर किंवा बिब्बा असे काही ना काही घालून ठेवतो. मात्र एखादवेळी हे घालायचे राहीले किंवा योग्य ती खबरदारी घेऊनही तांदूळामध्ये किड लागली तर (How To Store Rice Properly Home Remedies for Insect Free Rice) ?
अशावेळी घरात सहज उपलब्ध असतील अशा गोष्टींचा वापर करुन आपण ही किड लांब ठेवू शकतो. हे अन्न आपल्या पोटात जाणार असल्याने ते स्वच्छ आणि चांगलं असणं केव्हाही उत्तम. तसेच एकदा किड लागली की ती हळूहळू वाढत जाते आणि रोजचा स्वयंपाक करताना ही कीड साफ करण्यात बराच वेळ जातो. म्हणूनच किड लागूच नये म्हणून आधीच योग्य ती काळजी घेतली तर आपला पुढे होणारा बराच ताण वाचू शकतो. पाहूया महागड्या धान्याचे नुकसान होऊ नये तर तांदूळ साठवताना कोणती काळजी घ्यायला हवी. प्रसिद्ध शेफ पंकज भदौरीया पंकज के नुसखे यामध्ये अशीच एक सोपी पण महत्त्वाची अशी ट्रिक शेअर करतात.
१. तमालपत्र आणि लवंग
तमालपत्र आणि लवंग या दोन्ही गोष्टी आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असतात. मसाल्याचे पदार्थ असल्याने या दोन्हीला उग्र वास असतो. म्हणूनच तांदळाला अळ्या आणि किडीपासून मुक्त करण्यासाठी या दोन्हीचा अतिशय चांगला उपयोग होतो. या उग्र वासामुळे किड लागली असेल तर ती निघून जाण्यास मदत होते आणि नव्यानेही किड लागण्यापासून संरक्षण होते. याबरोबरच जंतुनाशक म्हणून आपण तांदळाच्या डब्यात लवंगाचे काही थेंब घातले तरी त्याचा चांगला फायदा होतो.
२. तांदूळाला ऊन देणे
उन्हाळ्याच्या दिवसांत तापमान जास्त असते. जर तांदूळांमध्ये किड किंवा अळ्या असतील, जाळी आली असेल तर ते उन्हात ठेवणे हा उत्तम उपाय असतो. असे केल्याने अळ्या आणि त्यांची अंडी दोन्ही नष्ट होतात. हा तांदूळ ओलसर असेल तर उन्हात ठेवल्याने तो चांगला वाळतो आणि बराच काळ टिकण्यास मदत होते.
३. कडूनिंबाचा पाला
चैत्र पाडव्याच्या निमित्ताने गुढीला लावण्यासाठी किंवा चटणी करण्यासाठी आपण सगळेच बाजारातून कडूनिंब आणतो. कडूनिंब त्वचा आणि आरोग्याच्या इतर समस्यांसाठी उपयुक्त असतो हे आपल्याला माहित आहे. पण कडू असणारा हा पाला उग्र असल्याने धान्याला किड लागू नये म्हणून उपयुक्त असतो.