पुजेसाठी घरात कापूर (camphor) असतोच. पण कापूर फक्त पुजेसाठीच वापरला जातो असं नाही. कापूर वापरुन घरातली अनेक छोटी मोठी कामं करता येतात. त्वचेच्या अनेक समस्यांवर कापूर उपाय म्हणून वापरला जातो. तसाच तो केसांच्या समस्यांसाठी,वापरता येतो. घरात किडे झालेले असल्यास, कपड्यांना कुबट वास येत असल्यास त्यावर उपाय म्हणून कापूर वापरता येतो. घरात सुगंध दरवळण्यासठी रुम फ्रेशनर (camphor as room freshner) म्हणूनही कापूर वापरता येतो. घरातल्या कामांसोबतच मनावरचा ताण घालवून शांत झोपेसाठीही कापूर फायदेशीर असतो. असा बहुगुणी कापूर घरातल्या अनेक समस्या सहज सोडवण्यासाठी (benefits of camphor) घरात असायलाच हवा.
Image: Google
कापूर कशासाठी?
1. डोक्यात उवा/लिखा / कोंडा झालेला असल्यास, गादीला ढेकणं झालेली असल्यास , घरात छोट्या मोठ्या किड्यांची समस्या असल्यास यावर उपाय एकच तो म्हणजे कापूर. घरातले किडे घालवण्यासाठी घराच्या विविध कोपऱ्यात कापूराच्या वड्या ठेवाव्यात. घरातले किडे घलवण्यासाठी थोडा चुरलेला कापूर, थोडी दालचिनी पावडर आणि थोडं पाणी घेऊन ते एक्त्र करुन त्याची पेस्ट करावी. ही पेस्ट घराच्या विविध कोपऱ्यात लावली की माशा, डास, किडे घरात येत नाही.
2. केसातील कोंडा/ उवा-लिखांची समस्या घालवण्यासाठी कापूर खोबऱ्याच्या तेलात मिसळावा. ते तेल कोमट करुन केसांना लावल्यास केसातील उवा/लिखा/कोंड्याची समस्या सहज सुटते.
Image: Google
3. घरात घाणेरडा वास येत असेल तर तो घालवण्यासाठी कापूर रुम फ्रेशनर सारखा वापरता येतो. रुम फ्रेशनर म्हणून कापूर वापरायचा झाल्यास कापूर बारीक करुन त्याची पावडर करावी. त्यात थोडे लवेण्डर इसेन्शियल ऑइलचे काही थेंब टाकावेत. ही कापूर पावडर पाण्यात मिसळावी. हे पाणी एका स्प्रे बाॅटलमध्ये भरुन घरात फवारल्यास घाणेरडा वास निघून जातो. घरात मस्त मनाला उत्साह देणारा सुगंध दरवळतो.
4. कपड्यांच्या कपाटात कपड्यांना येणारा वास घालवण्यासाठी एका फडक्यात तमालपत्रं आणि कापूर वडी एकत्र करुन ते फडक्यात बांधावं. ही पुरचुंडी कपाटात कपड्यांच्या खाली किंवा कोपऱ्यात ठेवली तर कपड्यांना वास येत नाही. कपड्यांना कुबट वास येवू नये किंवा कपड्यांना काळी/पांढरी बुरशी लागू नये म्हणून कपड्यात डांबराच्या गोळ्या ठेवल्या जातात. याऐवजी कापूरही वापरता येतो. सूती कापडात कापूर वड्या बांधाव्या. ही पुरचुंडी कपडाच्या मध्ये ठेवावी. या सोप्या उपायानं कपड्यांना कुबट वास येत नाही आणि कपड्यांना बुरशी लागत नाही.
Image: Google
5. ताणामुळे डोकं दुखत त्यावर उपाय म्हणूनही कापूर वापरता येतो. मनावरचा ताण जावून डोकं शांत होण्यासाठी, झोप चांगली लागण्यासाठी मातीच्या छोट्या भांड्यात ( पणती वापरली तरी चालते) कापूर वड्या ठेवाव्यात. हे भांडं आपण झोपतो त्याठिकाणी ठेवावं. कापूराच्या वासानं मेंदू शांत होण्यास मदत होते.