उन्हाळ्याच्या दिवसांत घरात मोठ्या प्रमाणात झुरळं, मुंग्या होतात. इतकेच नाही तर किडे, डास, पाली यांचाही वावर वाढतो. बाहेर उष्णता असल्याने हे किटक घरात गारव्यासाठी येतात. यांना घालवणे आणि घर स्वच्छ ठेवणे हे एक महत्त्वाचे काम असते. लिंबाचा यासाठी अतिशय चांगला उपयोग करता येतो. व्हिटॅमिन सी असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर असलेले लिंबू आपण स्वयंपाकात आवर्जून वापरतो. पदार्थाला आंबट चव यावी यासाठीही लिंबाचा चांगला फायदा होतो. उन्हाळ्याच्या दिवसांत तर आपण आवर्जून लिंबाचे सरबत करतो (How To Use Leftover Lemon Peels Home Cleaning Tips).
लिंबू पिळून झालं की आपण त्याची सालं कुकर स्वच्छ होण्यासाठी त्यामध्ये घालतो नाहीतर बहुतांशवेळा फेकून देतो. पण लिंबाचा रस निघाल्यानंतर राहीलेल्या सालींचाही अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो. या सालींपासून आपण घरच्या घरी क्लिनिंग सोल्यूशन तयार करु शकतो. आपण घरातील टाईल्स, फरशी, फर्निचर यांसारख्या गोष्टी साफ करण्यासाठी बाजारातून महागडे सोल्यूशन्स आणतो. त्यापेक्षा घरच्या घरी टाकाऊ गोष्टींपासून हे सोल्यूशन तयार होऊ शकते. ते कसे तयार करायचे आणि त्याचा नेमका कसा वापर करायचा पाहूया.
१. लिंबाचा रस पिळून झाल्यावर राहीलेली सालं मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात थोडं पाणी घालून त्याची बारीक पेस्ट तयार करायची.
२. त्यानंतर ही पेस्ट गाळून त्याचा अर्क एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा.
३. या रसात १ चमचा बेकींग सोडा आणि २ चमचे लिक्विड सोप किंवा भांड्याचा लिक्विड साबण घालायचा.
४. २ ते ३ डांबर गोळ्या घेऊन त्याचा बारीक चुरा करुन तो घालावा
५. यामध्ये ३ ते ४ ग्लास पाणी घालून हे मिश्रण १ तास तसेच ठेवावे. त्यानंतर एका बाटलीत भरुन आवश्यकतेप्रमाणे वापरावे.
उपयोग आणि फायदे
१. अनेकदा घरात झुरळं, मुंग्या, किडे, डास होतात. त्यासाठी डांबर गोळ्यांचा वास अतिशय फायदेशीर असतो. त्यामुळे किडे-मुंग्या निघून जाण्यास मदत होते.
२. कापूस, कापड किंवा टिश्यू पेपरवर हे सोल्यूशन घ्यायचे आणि घरात ज्याठिकाणी मुंग्या, झुरळं आहेत त्याठिकाणी हे सोल्यूशन असलेले कापड किंवा टिश्यू ठेवायचे.
३. या सोल्यूशनचा वापर फरशी पुसण्यासाठी, ओटा, फर्निचर साफ करण्यासाठीही करु शकतो. यामुळे घर चकचकीत होण्यास मदत होते.