Join us  

नवरा बायकोनं लग्नानंतर मिळून घटवलं 186 किलो वजन, म्हणाले ठरवलं तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2022 7:50 PM

31 डिसेंबर 2015 रोजी त्यांनी नवीन वर्षात वजन कमी करायचं असं ठरवलं. नुसतं ठरवलं नाही तर त्यांनी त्यासाठी नियम तयार केले. त्या दोघांनी मिळून 181 किलो वजन कमी केलं आहे पण अजूनही ते ठरवलेले नियम काटेकोर पाळत आहे. 

ठळक मुद्देलग्न झालं तेव्हा लेक्सीचं वजन 219 किलो तर डॅनीचं वजन 127 किलो होतं.लग्नानंतर सुखी आयुष्य जगण्यासाठी त्यांनी मिळून वजन कमी करण्याचा संकल्प केला.वजन कमी झालं तरी लेक्सी आणि डॅनी हे दोघेही नियम पाळण्याच्या बाबतीत काटेकोर आहेत. 

ऑक्टोबर 2015 मध्ये त्या दोघांनी लग्न केलं.  31 डिसेंबर 2015 रोजी दोघांनी मिळून एक संकल्प केला. तो संकल्प पूर्ण करण्यासाठी दोघांनी एकमेकांना वचन दिलं. त्यासाठी नियम ठरवले.  6 वर्षानंतरही दोघे आपल्या संकल्पावर ठाम आहे आणि दोघेही ठरवलेले नियम पाळत आहेत. लेक्सी  आणि डॅनी रीड हे अमेरिकेतलं जोडपं. 2015 मध्ये दोघं एकमेकांना भेटले आणि दोघांनी लग्नं केलं. दोघंही एकाच प्रश्नावर अडले होते. वाढत्या वजनाचं काय करायचं?

Image: Google

लग्न झालं तेव्हा लेक्सीचं वजन 219 किलो तर डॅनीचं 127 किलो. दोघांनाही खाण्याची प्रचंड आवड. पण आपलं वाढतं वजन लग्नानंतरच्या सुखी आणि समाधानी आयुष्यात आडकाठी निर्माण करत असल्याचं दोघांचं लक्षात आलं आणि 31 डिसेंबर 2015 रोजी त्यांनी नवीन वर्षात  वजन कमी करायचं असं ठरवलं. नुसतं ठरवलं नाही तर त्यांनी त्यासाठी नियम तयार केले. आज दोघांनी दुपटीपेक्षा अधिक वजन कमी केलं आहे पण 31 डिसेंबर 2015 च्या रात्री जे नियम ठरवले त्यावर आजही ती दोघं ठाम आहे.

लेक्सी आणि डॅनीने वजन कमी करण्यासाठी कमी खायचं, आठवड्यातले जास्तीत जास्त दिवस शाकाहारी जेवायचं, ऑफिसला गेलं की गाडी लांब पार्क करायची, बाहेरचं खाणं एकदम कमी करायचं , साखरयुक्त पेयं प्यायची नाही, आठवड्यातले पाच दिवस व्यायाम करायचाच  आणि डाएटच्या बाबतीत चीट डे नाही, हे नियम स्वत:ला घालून घेतले. दोघेही नियम पाळण्याच्या बाबतीत एकमेकांवर लक्ष ठेवू लागले. व्यायाम करताना एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागले. त्याचा परिणाम म्हणजे दोघांचंही वजन कमी झालं आहे. वाढलेल्या वजनामुळे दोघेही आपल्या वैयक्तिक जीवनात आपल्याला यापूर्वी कधीही न करता येणाऱ्या गोष्टींचा अनुभव घेत आनंदी जीवन जगत आहेत. 

Image: Google

लेक्सी म्हणते,  ती लहानपणापासून जाडच होती. आता जेव्हा तिनं वजन कमी केलं तेव्हा आपल्यात आत्मविश्वास निर्माण झाल्याचं तिला जाणवलं. तर डॅनी जोपर्यंत मित्रांसोबत मोकळ्या मैदानात खेळत होता तोपर्यंत त्याचं वजन नियंत्रित होतं , पण नोकरी लागली आणि त्याचं वजन सुटत गेलं. लेक्सी आणि डॅनीला खाण्याचं प्रचंड वेड. घरच्या खाण्यापेक्षाही रोज बाहेरचं जेवण मागवणं, नेटफ्लिक्सवर जंक फूड खात तासनतास बिंज वाॅचिंग करणं यामुळे दोघांचही वजन वाढत गेलं.

पण लग्नानंतर त्यांना डाॅक्टरांनी दोघांच्या वाढलेल्या वजनामुळे मूल होण्याबाबतच्या अडचणी आणि धोक्यांची जाणीव करुन दिली. दोघांनाही ही गोष्ट गंभीर वाटली. लग्नानंतरक्‌या सुखी आयुष्यासाठी म्हणून दोघांनी वजन कमी करायचा असा एकत्रित संकल्प केला आणि तो तडीस नेला. एकमेकांच्या सोबतीनं दोघांनी मिळून 181 किलो वजन कमी केलं. लेक्सीनं 141 किलो तर डॅनीने 43 किलो वजन कमी केलं. लेक्सी आणि डॅनीनं जगभरातील वजन वाढलेल्या जोडप्यांना स्वत:च्या उदाहरणातून नवरा बायकोनं ठरवलं तर अवघड आणि अशक्य गोष्टही शक्य होऊ शकते हे जगभरातील जोडप्यांना दाखवून दिलं आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलपती- जोडीदार