सकाळी उठल्यावर नाश्त्याला काय करायचं, दुपारच्या जेवणाला काय आणि रात्रीसाठी काय असा प्रश्न तमाम महिलांच्या डोक्यात सतत घोळत असतो. इतकेच नाही तर चटण्या, लोणची, मधेआधे खायला काहीतरी असेही काही ना काही करायचे प्लॅनिंग सुरू असते. कामांची सवय नसल्याने लग्नानंतर आपले कसे होणार अशी भितीही अनेकींना वाटते. पण एकदा लग्न झाले की हळूहळू सगळे जमायला लागते. असे असले तरी या गोष्टींचा ताण न घेणाऱ्याही काही महिला असतातच. त्या फारसा ताण न घेता एकतर बाहेर खातात किंवा मॅगीचा पर्याय स्वीकारतात. तोही बिचारा दुसरा काही पर्याय नसल्याने मुकाट सहन करतो. पण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत मॅगी खाऊन एक नवरा इतका वैतागला की त्याने थेट घटस्फोटासाठीच अर्ज केला.
(प्रातिनिधीक छायाचित्र)
तर त्याचे झाले असे की बल्लारी येथे राहणाऱ्या एका जोडप्यात मॅगीवरुन वाद झाले. हे वाद इतके विकोपाला गेले की नवऱ्याने थेट घटस्फोटच घेतला. मॅगी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. हे जरी खरे असले तरी आपल्याला दिवसातील तिन्ही वेळेला कोणी मॅगी खायला दिली तर आपण वैतागून जाऊ. मात्र स्वयंपाकातील काहीच न येणारी एक महिला सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत आपल्या नवऱ्याला फक्त मॅगी द्यायची. या कारणामुळे वैतागलेल्या नवऱ्याने न्यायालयात धाव घेत आपल्याला घटस्फोट हवा असल्याचे सांगत अर्ज दाखल केला. निवृत्त न्यायाधीश एमएल रघुनाथ यांनी या घटनेबाबतची माहीती दिली.
रघुनाथ सांगतात, बल्लारी येथे जिल्हा न्यायालयात काम करत असताना ही ‘मॅगी केस’ माझ्यासमोर आली. यामध्ये नवऱ्याने आपली बायको प्रोव्हीजनल स्टोअरमध्ये जाऊन फक्त मॅगी खरेदी करते आणि आपल्याला सतत मॅगीच खायला देते अशी तक्रार केली होती. दोघांची बाजू ऐकून घेतली आणि या दोघांनी सामंजस्याने घटस्फोट घेतला असे ते म्हणाले. पण मॅगी हे लग्न मोडण्याचे कारण ठरु शकते ही हास्यास्पद बाब आहे. हल्ली जोडप्यांमध्ये लहानसहान कारणांवरुन घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढले असल्याचे रघुनाथ यांनी यावेळी सांगितले. जोडप्यांमधले वाद हा हल्ली फार मोठा विषय झाला आहे. शारीरिक तक्रारींपेक्षा मतभिन्नता असल्याने होणाऱ्या वादांचे प्रमाण खूप जास्त आहे. मानसिक, भावनिकदृष्ट्या एकमेकांना समजून घेत नसल्याची उदाहरणे जास्त आहेत असेही त्यांनी सांगितले.