Join us  

तिसरे मूल जन्माला घातले तर कंपनीच देणार ११.५ लाख बोनस आणि वर्षभर सुट्टी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2022 11:36 AM

Baby bonus : सरकारी योजनांबरोबरच चीनमध्ये खासगी कंपन्याही देतात मूल जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन

ठळक मुद्देमूल जन्माला घालणाऱ्यांना सरकारबरोबरच खासगी कंपन्यांकडूनही एकाहून एक भन्नाट ऑफर्सतरुणांची लोकसंख्या वाढण्यासाठी चीन प्रयत्नशील

एकीकडे लोकसंख्या कमी करण्यासाठी भारतासारख्या विकसनशील देशात काही नियम लागू केले जातात. तर जपानसारख्या विकसनशील देशात तरुणांनी लग्न करावीत आणि मुलांना जन्म द्यावा यासाठी सरकार एकाहून एक योजना जाहीर करते. या सगळ्यात आता आणखी एक भर पडली आहे. चीन हा सर्वाधिक लोकसंख्या असणारा एक देश आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. देशात लोकसंख्येचा विस्फोट झालेला असताना या लोकसंख्येवर नियंत्रण यावे यासाठी चीन सरकारने केवळ एक मूल जन्माला घालणाऱ्यांना काही विशेष सुविधा लागू केल्या होत्या. मात्र त्यामुळे येथील लोकसंख्या आटोक्यात यायला काही प्रमाणात मदत झाली. इतकेच नाही तर याचा परिणाम म्हणजे चीनमध्ये गेल्या काही वर्षात वयस्कर लोकांची संख्या वाढली आणि तरुणांची संख्या घटली. 

ही गोष्ट लक्षात घेऊन चीन सरकारने जास्त मुलांना जन्म देण्याऱ्यांना प्रोत्साहन (China baby bonus) देण्यास सुरुवात केली. यातच चीनमधील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक भन्नाट ऑफर जाहीर केली आहे. तिसरे मूल जन्माला घालणाऱ्या जोडप्यांना कंपनीतर्फे १ वर्षाची सुट्टी आणि तब्बल ११.५० लाख रुपयांचा बोनस कंपनीतर्फे दिला जाणार आहे. चीनमधील प्रसिद्ध वृत्तपत्र असलेल्या नॅशनल बिझनेस डेलीमध्ये याबाबतचे वृत्त देण्यात आले आहे. 

(Image : Google)

सरकारही असे देते तिसऱ्या मुलासाठी प्रोत्साहन

या वृत्तानुसार, चीनमध्ये बेबी बोनस, जास्तीच्या पगारी रजा, करामध्ये सूट, मूलांचे पालनपोषण करण्यासाठी अनुदान अशा सुविधा देण्यात येत आहेत. जोडप्यांनी तिसरे मूल जन्माला घालावे यासाठी हे प्रयत्न होत असताना सरकारबरोबरच खासगी कंपन्याही आपल्या कर्माचाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना जाहीर करताना दिसत आहे. यामध्ये सुट्टी, बोनस यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय ठराविक शहरेही आपल्या नागरीकांसाठी काही खास सुविधा देत आहेत. 

(Image : Google)

काय आहे कंपनीची बंपर ऑफर

टेक्नॉलॉजी कंपनी असलेल्या Beijing Dabeinong Technology Group ने आपल्या कर्मचाऱ्यांना तिसऱ्या मुलाला जन्म दिला तर अतिशय बंपर ऑफर जाहीर केली आहे. कंपनीकडून ९० हजार युआन म्हणजेच जवळपास ११.५० लाख रुपये या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून देण्यात येणार आहेत. महिला कर्मचाऱ्यांना १२ महिन्यांची सुट्टी देण्यात येणार असून पुरुषांना ९ महिन्यांसाठी पॅटर्निटी लिव्ह देण्यात येणार आहे. इतकेच नाही तर ही कंपनी पहिल्या आणि दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठीही बोनस देत आहे. पहिले मूल असेल तर ३० हजार युआन म्हणजेच जवळपास ३.५४ लाख रुपये तर दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी ६० हजार युआन म्हणजेच जवळपास ७ लाख रुपये देण्यात येणार आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलचीन