Join us  

सासू असावी तर अशी...मुलाच्या मृत्यूनंतर सुनेला शिकवून केले शिक्षक, दुसऱ्या लग्नासाठी घेतला पुढाकार आणि...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2022 11:29 AM

नेहमीच्या सासू-सुनेच्या नात्यापेक्षा वेगळी गोष्ट नक्कीच वाचण्याजोगी..

ठळक मुद्देमुलाच्या मृत्यूनंतर मुलाप्रमाणे सांभाळ करणाऱ्या सासूनेच केले सुनेचे कन्यादान सुनेला शिकवून तिचे दुसरे लग्न लावणाऱ्या सासूचे कौतुक करावे तेवढे थोडेच

सासू-सून म्हणजे भांडण असं एक समीकरणच आपल्या डोक्यात पक्के असते. टीव्हीवरील मालिकांमध्ये किंवा सामान्य घरातही सासू-सुनेच्या नात्यावरुन नेहमी चर्चा होताना दिसते. पण या सगळ्याला अपवाद ठरेल अशी घटना राजस्थानमधील फतेहपूरमध्ये नुकतीच घडली आहे. सुनेशी चांगलं न वागण्यामुळे अनेकदा घरांमध्ये टोकाचे वाद होतात अशात एका सासूने आपल्या सुनेला शिकवले आहे. इतकेच नाही तर आपल्या पोटच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर या सासूने सुनेला प्राध्यापक करुन तिचे दुसरे लग्नही लावून दिले आहे. पोटच्या मुलीशी ज्याप्रमाणे वागू त्याचप्रमाणे सुनेला सून न मानता पोटच्या मुलीप्रमाणे वागणाऱ्या या सासूचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. 

(Image : Google)

स्वत: शिक्षिका असलेल्या कमला देवी यांचा लहान मुलगा शुभम याचे २०१६ मध्ये सुनिता हिच्याशी लग्न झाले. लग्नानंतर शुभम वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी किर्गीस्तान येथे गेला. त्याठिकाणी सहा महिन्यातच शुभमचा ब्रेन स्ट्रोकने मृत्यू झाला. या धक्क्यातून सावरत असतानाच शुभमच्या आईने म्हणजेच कमला देवी यांनी आपल्या घरी आलेल्या सुन्ताला शिकवायचे ठरवले. ग्रेड १ ची शिक्षिका झाल्यानंतर तब्बल ५ वर्षांनी या सासूने सुनिताचा मुलीप्रमाणे अतिशय धामधूमीत लग्न लावून दिले. याबाबत शुभमचा मोठा भाऊ म्हणाला, शुभम गेल्यानंतर कमला देवी यांनी सुनिताला अतिशय प्रेमाने सांभाळले. तिनेही तितक्याच आपुलकीने आईची प्रत्येक गोष्ट ऐकली. शुभम गेल्यानंतर आईने तिला एम.ए, बीएड पर्यंत शिकवले. मागच्याच वर्षी सुनिताची इतिहासाची शिक्षिका म्हणून नियुक्ती करण्यात आली. सुनिताने आपल्या सासरच्या लोकांची काळजी घेण्याबरोबरच आपल्या आई-वडिलांची आणि भावाचीही काळजी घेतली. 

याबाबत बोलताना कमला देवी यांनी सांगितले, की आपला मुलगा शुभम आणि सून हे कोणत्या कार्यक्रमात एकमेकांना भेटले होते. त्यानंतर दोघांच्या घरी बोलणी झाल्यानंतर त्यांचे लग्न ठरले. मात्र लग्नाच्या वेळी सूनेच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने कोणताही हुंडा न घेता हे लग्न पार पडले. मात्र नियतिच्या मनात काहीतरी दुसरेच होते, अचानक आपल्या मुलाचा झालेला मृत्यू पचवणे या संपूर्ण कुटुंबाला अतिशय जड गेले. पुढे कमला देवी म्हणतात, आधी आपल्या सुनेने जन्म झाल्यानंतर इतकी वर्षे आपल्या आईवडिलांच्या घरात आनंद दिला, त्यानंतर आपल्या घरातही ती एखाद्या मुलाप्रमाणे राहीली. आता नव्याने लग्न झालेल्या घरीही ती तितकाच आनंद निर्माण करेल. कमला देवी यांनी सुनितासाठी चांगला वर शोधून तिचे कन्यादान केले. सुनितानेही सासूने आपल्याला सासू नाही तर आईप्रमाणे इतके वर्ष सांभाळले असे सांगितले.  

टॅग्स :सोशल व्हायरललग्न