शारदीय नवरात्रोत्सवातील महत्त्वाचा दिवस म्हणजे ललिता पंचमी. या दिवशी कुमारिकांची पूजा करण्याची पद्धत आहे. त्यामुळे कुमारिकांना आवर्जून घरी बोलावले जाते. त्यांच्यासाठी साग्रसंगीत जेवण, त्यांची पूजा आणि मग त्यांना भेटवस्तू देण्याची रीत आहे. लक्ष्मीच्या रुपाने या कुमारीका आपल्या घरी येत असल्याचे मानले जाते. त्यामुळे या कुमारिकांचा या दिवशी खास मान असतो. या कुमारिका अगदी २ ते ३ वर्षापासून ते १० वर्षापर्यंत असतात. साधारणपणे ५-७ किंवा १० कुमारिकांना बोलावण्याची रीत आहे. या कुमारीकांना बोलावल्यावर त्यांना आपल्या घरात मोकळे वाटावे आणि त्यांनी बुजू नये यासाठी काही सोप्या टिप्स आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे कुमारीका त्यांचे केलेले कौतुक पाहून खूश तर होतीलच पण आपल्यालाही त्यांना आनंदी पाहून समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही (4 Things to keep in mind while inviting Kumarika on Lalita panchami in Navratri).
१. खेळायचे वातावरण ठेवा
आपल्या घरात लहान मुले असतीलच असे नाही. पण आपण बोलवलेल्या कुमारिका लहान असतील तर त्यांना खेळता येतील अशी खेळणी किंवा गोष्टी समोर ठेवा. म्हणजे त्या घरात आल्यावर न बुजता घरात कम्फर्टेबली वावरु शकतील. यासाठी आपण शेजारपाजारुन काही खेळणी, एखादा बॉल असे काही आणून ठेवू शकतो.
२. आवडीच्या विषयांवर गप्पा मारा
आपण घरी लहान मुले आली की त्यांना साधारणपणे नाव, शाळेचे नाव, इयत्ता अशा गोष्टी विचारतो. पण मुलांशी जर त्यांच्या आवडीच्या विषयांवर गप्पा मारल्या तर त्यांना बरे वाटते आणि ते मोकळे होण्यास मदत होते. त्यांच्या आवडीचे गेम्स, कार्टून्स यांविषयी गप्पा मारल्या तर त्यांना मजा येते.
३. खाण्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त आग्रह करु नका
सगळीच मुले दुसऱ्यांच्या घरी काही खाताना कम्फर्टेबल असतील असं नाही. आपण अतिशय आनंदाने मुलांसाठी विविध पदार्थ करुन जेवण केलेले असते. मात्र त्यांना आवडतील तेच पदार्थ त्यांची भूक जितकी आहे तितके वाढा. जास्त आग्रह केला किंवा सतत विचारत राहीले तर मुली खाताना कॉन्शियस होण्याची शक्यता असते. त्यामुळे आवश्यक तितकाच आग्रह करायला हवा.
४. भेटवस्तू देताना
मुलींना उपयुक्त, त्यांना आवडेल अशी भेटवस्तू दिली तर त्या जास्त खूश होतील. ही भेटवस्तू खूप महागडी असायला हवी असं काही नाही. पण एखादे गोष्टीचे पुस्तक, अॅक्टीव्हीटी बुक, हेअर अॅक्सेसरीज, पर्स असं काही देऊन आपण मुलींना नक्कीच खूश करु शकतो.