कर्करोग असं नुसतं म्हटलं तरी आपले धाबे दणाणते. आपल्याला कर्करोग आहे हे समजल्यावर तर अनेकांच्या पायाखालची जमिन सरकते. याचे कारण म्हणजे हा आजार रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या थकवणारा असतो. पण प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री छावी मित्तल मात्र या परिस्थितीशीही अतिशय धैर्याने तोंड देत असल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वीच छावीला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर तिचे मित्रमंडळी आणि फॅन्सनी तिला या आजारातून बरे होण्यासाठी भरभरुन शुभेच्छा दिल्या होत्या. नुकतीच तिच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तिने सोशल मीडियावर अतिशय भावनिक पोस्ट केली आहे. पण तिच्या या पोस्टमधून तिच्यातील सकारात्मकता दिसून येते.
आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, शस्त्रक्रियेआधी मला भूल देणाऱ्या डॉक्टरांनी मला डोळे मिटून चांगल्या गोष्टीचा विचार करायला सांगितले. त्यावेळी मी माझे ब्रेस्ट अतिशय छान आणि हेल्दी आहेत असा विचार केला आणि डोळे मिटले. त्यानंतर जी गोष्ट मला माहित आहे ती म्हणजे मी कॅन्सर फ्रि झाले. माझ्यावर ६ तासांची सर्जरी करण्यात आली. यामध्ये वेगवेगळ्या प्रक्रियांचा समावेश होता. अजून हा पल्ला खूप मोठा आहे, मात्र यातील सगळ्यात वाईट भाग आता संपला आहे. तुम्ही सगळ्यांनी माध्यासाठी केलेली प्रार्थना खूप महत्त्वाची असून पुढेही माझ्यासाठी अशीच प्रार्थना करत राहा असे ती आपल्या चाहत्यांना सांगते. असेच माझ्यासोबत कायम राहा अशी अतिशय भावनिक विनंतीही ती आपल्या चाहत्यांना करते.
सगळ्यात शेवटी आपला नवरा मोहित हुसैन याच्या डोळ्यात आपल्य़ाला पुन्हा कधीही अश्रू पाहायचे नाहीत असेही ती म्हणते. इन्स्टाग्रामवर केलेल्या तिच्या या पोस्टला नेटीझन्सनी मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स दिला असून ३ तासांत जवळपास १४ हजार लाईक्स आले आहेत तर अनेकांनी तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छआ दिल्या आहेत. ब्रेस्ट कॅन्सरची शस्त्रक्रिया होण्याआधीही छावीने रुग्णालयात डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्याला कॅप्शन देताना तिने लिहीले होते की डॉक्टर म्हणाले चिल कर, म्हणून मी चिल करतीये...एकीकडे शस्त्रक्रियेचा ताण असूनही ती स्वत:ला आनंदी आणि सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करत आहे ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे असे म्हणायला हरकत नाही.