तिखट पदार्थांचे जसे शौकिन असतात, तसेच गोड पदार्थ आवडणाऱ्यांची खवय्येगिरीही काही कमी नाही. पक्के गोडघाशे असणारे लोक नेहमीच गोडाच्या शोधात असतात. काही जणांना तर जेवण झाल्यावर दररोज काही तरी गोड पदार्थ तोंडात टाकायला हवा असतो. गोड- गोड खाल्ल्यामुळे तब्येतीवर काय परिणाम होऊ शकतो, हे ते लोक अगदी व्यवस्थित जाणून असतात. पण तरीही मन काही हे सगळं ऐकण्याच्या तयारीत नसते. जीभ देखील गोड पदार्थ खाण्यासाठी वाट बघत असते. अशा गोडघाशे मंडळींसाठीच आहे भारताचा हा स्वीट मॅप.
भारताचे अनेक नकाशे तुम्ही आजवर पाहिले असणार. पण कोणत्या प्रांतात कोणते गोड पदार्थ आहेत, त्यांची खासियत काय, हे सांगणारा अफलातून नकाशा सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अगदी गुजरातपासून सेव्हन सिस्टर्सपर्यंत आणि लडाखपासून तामिळनाडूपर्यंत भारतातल्या प्रत्येक राज्यातल्या गोड पदार्थांची यादी या नकाशामध्ये दिलेली आहे. या नकाशावरून एकदा नजर फिरवली तरी गोड पदार्थांचे चाहते असणाऱ्या खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटणार हे नक्की.
बऱ्याचदा आपण पर्यटनासाठी जेव्हा बाहेर जातो, तेव्हा त्या- त्या प्रदेशाची काय खासियत आहे हे जाणून घेतो. सगळ्यात आधी आपण विचार करतो तो त्या प्रदेशातल्या कोणत्या वस्तू प्रसिद्ध आहेत आणि आपल्याला कशाची शॉपिंग करता येईल याचा आणि दुसरा विचार असतो त्या प्रदेशातले खाद्य पदार्थ. त्या भागातल्या स्थानिक लोकांकडून खाद्य पदार्थांची नावे तर कळतात, पण त्यात मुख्यत: तिखट पदार्थांचा जास्त भरणा असतो. म्हणूनच मोठ्या प्रेमाने गोड पदार्थांचा आस्वाद घेणाऱ्या गोडघाशांसाठी हा नकाशा अतिशय उपयुक्त आहे.
पेठा, मोहनथाल, शेवया, रबडी, खाजा, रसगुल्ला, घेवर अशा मोजक्याच गोड पदार्थांची नावे आपल्याला माहिती असतात आणि त्यांची चव आपण चाखलेली असते. पण एवढेच आपल्याकडचे गोड पदार्थ नाहीत. भाषा, वेशभुषा, परंपरा, संस्कृती ही जशी भारताच्या प्रत्येक प्रांतात वेगवेगळी असते, तशीच विविधता गोड पदार्थांमध्येही दिसून येते.
पंजाबची अट्टापन्नी, मध्य प्रदेशातली मावा बाती, ओरीसाचा छेना पोडा, झारखंडची दुधौरी, सिक्कीमची सील रोटी, मेघालयची पुखलेन अशा भारतातल्या कित्येक गोड पदार्थांची नावेही आपल्याला माहिती नाहीत. म्हणूनच तर भारत भ्रमणाला निघाल्यावर भारताचा हा स्वीट मॅप अवश्य सोबत ठेवा आणि प्रत्येक प्रांतात गेल्यावर तिथले प्रसिद्ध गोड पदार्थ नक्कीच चाखून बघा. गोड पदार्थांची ही सैर नक्कीच खवय्यांची रसनातृप्ती करणारी ठरेल.