महिलांनी आयुष्यात कशी प्रगती करावी किंवा त्यांच्या करिअर लाईनचा ग्राफ दरदिवशी कसा चढता असावा, याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे इंद्रा नुयी. आज बिझनेस जगतातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून इंद्रा नूयी यांच्याकडे पाहिलं जातं. त्या मागे अर्थातच त्यांचा प्रचंड मोठा संघर्ष आहे. या संघर्षाची सुरुवात जेव्हा झाली होती, तेव्हा साडी नेसण्यावरून त्यांना देखील कमी लेखलं गेलं होतं. या गोष्टीचा खुलास खुद्द इंद्र नुयी यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. इंद्रा नुयी लिखित 'My Life in Full: Work, Family and our Future' या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. करिअरची सुरूवात ते एका अग्रणी कंपनीची सीईओ, असा सगळा त्यांचा प्रवास त्यांनी या पुस्तकात मांडला आहे.
आज प्रत्येक क्षेत्रात महिला धडाडीने कार्यरत आहेत. काम करताना किंवा कामासाठी जाताना- येताना सोयिस्कर व्हावं, म्हणून कामाच्या ठिकाणी साडी नेसणं अनेक महिला टाळतात. पण ऑफिसमध्ये साडी नेसून न जाण्याचं हे काही एकमेव कारण नाही. अनेक महिलांचा असा अनुभव आहे की साडी नेसणारी महिला आणि फॉर्मल कपड्यांमध्ये ऑफिसला येणारी महिला यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. दोघी एकाच कार्यालयात, एकाच हुद्द्यावर काम करत असल्या तरी साडी नेसणाऱ्या महिलेला कमी लेखलं जातं आणि फॉर्मल घालणाऱ्या महिलेला अधिक स्मार्ट, हुशार, मॉडर्न समजलं जातं. असाचा काहीसा अनुभव इंद्रा नूयी यांना देखील आला होता.
हा अनुभव त्यांनी त्यांच्या पुस्तकात मांडला आहे. मद्रास येथील सामान्य मध्यमवर्गीय घरातली ही मुलगी जेव्हा १९७८ साली येल स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये गेली हाेती, तेव्हा एका इंटरव्ह्यूसाठी जात असताना त्यांच्याकडे फॉर्मल कपडे नव्हते. त्यांनी कशीबशी पैशाची जुळवाजुळव केली आणि ५० डॉलर्सचे कपडे घेतले. हे कपडे काही मापाचे बसले नाहीत. कपडे बदलून आणायला वेळ नव्हता. शेवटी त्यांनी तेच कपडे घातले आणि इंटरव्ह्यू दिला. कपडे मापाचे नव्हते त्यामुळे लोक विचित्र नजरेने त्यांच्याकडे पाहत होते. त्यांनी कुणाचीही पर्वा न करता इंटरव्ह्यू दिला खरा पण त्यानंतर मात्र त्यांना हे सगळे आठवून रडू कोसळले.
त्यांच्या करिअर डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटचे संचालक जेन मॉरिसन यांना त्यांनी सगळा प्रसंग सांगितला. त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि हळूवार आवाजात प्रश्न विचारला की हा इंटरव्ह्यू जर भारतात असला असता तर त्यांनी कोणते कपडे घातले असते? यावर इंद्रा यांनी साहजिकच साडी असे उत्तर दिले. जेन यांनी त्यांना पुढच्या इंटरव्ह्यूला जाताना साडी नेस असे सुचविले. इंद्रा यांनी तसेच केले आणि त्यांना ती नोकरी मिळाली देखील.
नोकरी मिळाल्यानंतर इंद्रा यांनी शिकागो येथील एका फर्ममध्ये इंटर्न म्हणून काम करायला सुरुवात केली. ऑफिसला जाताना त्या दररोज साडी नेसायच्या. कारण फॉर्मलपेक्षा साडीतच त्यांना अधिक आत्मविश्वास वाटायचा. पण त्यांचं असं साडी नेसणं त्यांच्या सहकाऱ्यांना रुचायचं नाही. त्यांनी इंद्रा यंना मग क्लायंट मिटिंगला नेणंच बंद केलं. साडी म्हणजे त्यांना जरा कमी दर्जाचं वाटायचं. मी ही त्यांचा विचार समजून घेतला आणि त्यावर कधी आक्षेप घेतला नाही.
पण सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज त्या घटनेला एवढी वर्ष उलटून गेली. काळ खूप पुढे सरकला. महिला खूप अधुनिक झाल्या तरीही बहुतांश लोकांचा साडी नेसणाऱ्या महिलांकडे बदललेला दृष्टीकोन बदललेला नाही. आजही असे अनेक लोक आहेत, ज्यांना असं वाटतं की ज्या स्त्रिया साड्या नेसतात, त्या मॉडर्न किंवा सक्षम नसतात. अशावेळी तुमची बुद्धीमत्ता न पाहताही तुम्ही काय आणि कोणते कपडे घालता यावरून तुमच्या हुशारीचा दर्जा ठरवला जातो. अशा जुनाट, बुरसटलेल्या आणि प्रतिगामी विचारांतून पुढे जाण्याची वेळ आता आली आहे, असेही नूयी यांनी हा अनुभव सांगताना म्हंटले आहे.