Join us  

इंतेहा हो गयी इंतजार की..! लग्न ठरलं, साखरपुडा झाला आणि नवरदेव नवरी पळून गेले.. कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2022 11:13 AM

Social Viral Bihar बिहारमध्ये कपलचं लग्न ठरलं. मात्र लग्नाला उशीर झाल्याचे कळताच घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला.

बिहार एक असं राज्य आहे, जिथे दररोज अतरंगी गोष्टी घडताना दिसतात. तेथील हटके लव्ह स्टोरी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. लग्नाच्या रीतिरिवाजानुसार पहिले साखरपुडा, नंतर हळद आणि मग लग्न होते. साखरपुडानंतर लग्नाची जोरदार तयारी सुरू होते. तर काही कपलचं प्रकरण घरच्यांकडून मान्य नसेल तर ते पळून जाऊन लग्न करतात. मात्र, बिहारमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आलाय. तरुण-तरुणीचे लग्न ठरले होते. मात्र लग्नाला उशीर होणार असल्याचे कळताच दोघेही घरातून पळून गेले. दोघांच्या लग्नाची बिहारमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

तर ही अजब घटना घडली आहे बिहारमधील सारण जिल्ह्यातील पानापूर या गावात. या जोडप्याचे आधीच लग्न ठरले होते. २०२३ च्या मे महिन्यात हे जोडपं विवाहबंधनात अडकणार होते. त्यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम देखील पार पडला. मात्र, तरुणाला इतकी कसली घाई झाली माहीत नाही, तो तरुणीला घेऊन फरार झाला. लग्न ठरलंय, साखरपुडा झाला, तरी देखील या पठ्ठ्याने 'दुल्हनियाँ हम ले जायेंगें' म्हणत तरुणीला घेऊन 'नो दो ग्याराह' झाला.

लग्न ठरल्यानंतर हे लव्ह बर्डस एकमेकांशी मोबाईल फोनद्वारे दररोज बोलत असत. लग्नाला उशीर होणार असल्याचे कळताच त्यांनी घरातून पळून जाण्याचा बेत आखला. मुलीच्या कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांनी मुलीचा शोध सुरू केला. कोणतीही खबर न मिळाल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान फिरवून शोध घेतला. मात्र, पळून गेल्यानंतर हे जोडपं खुद्द त्यांच्या गावी पोहचले. तेथील लोकांनी पळून जाण्याचे कारण विचारले असता, तेव्हा तरुणाने सांगितले की, " लग्नाची तारीख खूप लांब आहे, त्यामुळे आम्ही दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. आम्हा दोघांना लवकर लग्न करायचे  आहे". हे ऐकून संपूर्ण गावाला आश्चर्याचा धक्का बसला.

याप्रकरणी पानापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विकास कुमार यांनी मध्यस्थी केली. त्यांनी दोघांच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. आणि त्यांचे लग्न तेथील मंदिरात लावून दिले. तेव्हापासून दोघांचे लग्न परिसरात आणि जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.

टॅग्स :बिहारसोशल व्हायरलसोशल मीडिया