Join us  

खायला गेले इंटरनॅशनल डिश आणि समोर आली खिचडी, असं झालं तर? व्हिडिओ पाहा आणि सांगा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 5:10 PM

मूळ भारतीय पदार्थ परदेशात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. आपण एखादी फॅन्सी डिश ऑर्डर करावी आणि आपल्यासमोर शिरा किंवा खिचडी यावी...पाहा व्हिडिओ...

ठळक मुद्देभारतीय डिजिटल पार्टी (भाडीपा) या प्रसिद्ध युट्यूब चॅनेलच्या विषय खोल या फेसबुक पेजवर सारंग साठ्ये यांनी याबाबत व्हिडिओ शेअर केला आहे अनेकांनी या व्हिडिओच्या कमेंटसमध्ये एकाहून एक भन्नाट पदार्थांची नावं सांगितली आहेत, जे मूळ भारतीय पदार्थ असून परदेशात ते वेगळ्या नावांनी विकले जातात.

भारतीय पदार्थांमध्ये जितकी विविधता आहे तितकी जगात कुठेही शोधून सापडणार नाही. भारतात विविध धर्म, जाती आणि प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती आणि पदार्थांची रेलचेल असते. पण परदेशात जाऊन हेच पदार्थ फॅन्सी नावाने विकले जातात. आपण परदेशात कामानिमित्त किंवा फिरायला कधी गेलो तर त्याठिकाणी मिळणाऱे पदार्थ ट्राय करायचे म्हणून आपण एखादा पदार्थ ऑर्डर केला आणि आपल्यासमोर शिरा किंवा मूगाच्या ड़ाळीची खिचडी समोर आली तर? वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण आपण नियमितपणे खात असणारे अगदी साधे असे भारतीय पदार्थ परदेशात फॅन्सी नावांनी विकले जातात. विशेष म्हणजे तिथे लोक हे पदार्थ आवडीने खातातही. 

(Image : Google)

परदेशात जाऊन तुम्ही केज्युरी द्या असे म्हटलात तर तुम्हाला वाटेल आपल्यासमोर कोणतातरी भन्नाट पदार्थ येईल. म्हणून तुम्ही आतुरतेने हा पदार्थ समोर येण्याची वाट पाहत राहाल. मात्र हा पदार्थ समोर आल्यावर तुम्ही अवाक झाल्यावाचून राहणार नाही. याचे कारण म्हणजे केच्युरी म्हणजे तुमच्यासमोर मूगाच्या डाळीची खिचडी आलेली असेल. आजारी असताना किंवा खूप भूक लागल्यावर आपल्याकडे रात्रीच्या जेवणाला केली जाणारी झटपट अशी मूगाच्या डाळीची ही खिचडी परदेशात केज्युरी या नावाने ओळखली जाते. इतकेच नाही तर इजिप्तमध्ये बस्बुजा नावानी एक पदार्थ मिळतो आता नाव इतके हटके आहे म्हटल्यावर हा पदार्थ नेमका काय असेल अशी उत्सुकता आपल्या सगळ्यांना वाटू शकते. पण हा बस्बुजा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून रव्याचा शिरा असतो. याठिकाणी लोक अतिशय आवडीने हा पदार्थ खातात. त्यामुळे मूळ भारतीय त्यातही प्रामुख्याने महाराष्ट्रात केला जाणारा हा प्रसादाचा पदार्थ किंवा प्रसिद्ध गोड पदार्थ परदेशातही वेगळ्या नावानी विकला जातो ही आनंदाची बाब आहे.

यामध्ये आणखी एक गोष्ट आहे. आपण आजारी पडलो किंवा आपल्याला सर्दी-कफ झाला असेल तर आपली आई किंवा आजी आपल्याला आवर्जून हे पेय प्यायला लावते. ते म्हणजे दूध-हळद. टर्मरिक लाटे म्हणून परदेशात प्रसिद्ध असणारे हे पेय आपल्याकडे आपण अनेक वर्षांपासून औषध म्हणून पीत आहोत. तेव्हा भारतीय पदार्थ फॅन्सी नावाने परदेशात विकले जाणे ही भारतीय म्हणून आपल्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. भारतीय डिजिटल पार्टी (भाडीपा) या प्रसिद्ध युट्यूब चॅनेलच्या विषय खोल या फेसबुक पेजवर सारंग साठ्ये यांनी याबाबत माहिती देणारा व्हिडिओ शेअर केला असून अवघ्या ३ दिवसांत १४ हजार नेटीझन्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे. विशेष म्हणजे तुम्हालाही असे काही पदार्थ माहित असतील तर नक्की सांगा असे विचारल्याने अनेकांनी या व्हिडिओच्या कमेंटसमध्ये एकाहून एक भन्नाट पदार्थांची नावं सांगितली आहेत, जे मूळ भारतीय पदार्थ असून परदेशात ते वेगळ्या नावांनी विकले जातात. 

टॅग्स :सोशल व्हायरलअन्नपाककृती