उकाडा सुरू झाला की आपण आइस्क्रीम, कुल्फी, लस्सी, ज्यूस असे सगळे घेतो. उन्हामुळे झालेली शरीराची लाहीलाही कमी करण्यासाठी आपण गारेगार काहीतरी खात किंवा पित असतो. यामुळे फारसा फरक पडत नसला तरी काही वेळ तरी गार वाटते आणि उन्हापासून आराम मिळतो. पण म्हणून काय वाट्टेल ते करावं का. सोशल मीडियामुळे हे पदार्थ आणि त्यांचे व्हिडिओ व्हायरलही होतात. कधी चॉकलेट पाणीपुरी तर कधी गुलाबजाम सामोरा, कधी मॅगी सँडविच तर कधी आणखी काही. भारतीय पदार्थांमध्ये असलेली विविधता आणि त्यामध्ये प्रयोग करण्याची असलेली आवड यामुळे हे नवनवीन पदार्थ सोशल मीडियावर काही कालावधीत प्रसिद्ध होतात.
नुकताच अशाच एका हटके पदार्थाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक व्यक्ती आइस ढोकळा चाट करताना दिसत आहे. आता नुसता ढोकळा आणि चटणी खाणे ठिक आहे. फारतर ढोकळा टाचही ठिक आहे. पण आइस ढोकळा चाट असा प्रकार तुम्ही कधी ट्राय केलाय? हा व्यक्ती ढोकळ्यावर चक्क बर्फ टाकत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सुरुवातीला तो एका प्लेटमध्ये ढोकळा घेऊन त्याचे तुकडे करतो. त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या घालतो. नंतर त्यावर बर्फ घालून कांदा, दही, कोथिंबीर, शेव असे चाटमधील सर्व पदार्थ घालतो. मुंबईच्या घाटकोपरमधील खाऊगल्लीमध्ये हा ढोकळा चाट प्रकार मिळत असून तुम्हाला ट्राय करायचा असेल तर तुम्ही आवर्जून याठिकाणी जाऊ शकता. या आगळ्यावेगळ्या डीशची किंमत ६० रुपये असल्याचेही या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.
इन्स्टाग्रामवर द टेम्पटेशनली या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून काही दिवसांत या पोस्टला ४० हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. नेटीझन्सनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या नवीन प्रकाराचे कौतुक केले आहे तर काहींनी या डीशला खूप नावे ठेवली आहेत. आता या बर्फाचे ढोकळा चाट खाईपर्यंत पाणी होत असणार हे नक्की. पण उन्हाळ्यातील उकाडा कमी करण्यासाठी ही आगळीवेगळी डीश खाऊन बघायला काय हरकत आहे. त्यामुळे तुम्हाला ढोकळा आणि चाट हे दोन्ही प्रकार आवडत असतील तर तुम्हीही हा प्रकार एकदा नक्की ट्राय करुन पाहा. घरच्या घरीही तुम्ही हा प्रयोग करु शकता.