कधीही पाहिलं तरी घरात पसाराच पसारा झालाय, सतत सगळीकडे कपडे, मुलांची खेळणी, वह्या-पुस्तकं आणि अशा अनेक वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. एकीकडे कीचनमधील जबाबदारी, दुसरीकडे ऑफीसच्या कामाची घाई, स्वत:चे आवरायला लागणारा वेळ आणि त्यात सदानकदा होणारा हा पसारा (Home cleaning Tips) यामुळे घरातील महिलांना अगदी नको होऊन जाते. वस्तू कितीही आवरुन ठेवल्या तरी थोडा वेळाने पुन्हा जैसे थे स्थिती येते आणि काय करावे आणि काय नाही हेच समजत नाही. मग घरातील इतर लोकांवर ओरडून त्यांना धाकाने का होईना या वस्तू जागच्या जागी ठेवायला सांगितले जाते. पण घर स्वच्छ असेल तर मन प्रसन्न राहते. बाहेरुन आल्यावर घरात पाऊल ठेवले आणि घर पसरलेले असले की मात्र पार मूडच जातो. अशावेळी घर आवरण्यासाठी नुसते कष्ट करुन उपयोग नसतो तर काही स्मार्ट टिप्सचा वापर करणे गरजेचे असते. तेव्हा तुम्हालाही पसरलेले घर आवरायचे असेल तर या सोप्या टिप्स नक्की लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचे घर तर आवरले जाईलच पण पसाऱ्यामुळे होणारी तुमची चिडचिडही कमी होईल.
१. गोष्टी कपाटात किंवा भिंतीला लटकवून ठेवा
आपल्याला नियमितपणे लागणाऱ्या हँडबॅग, स्लिंग, सॅक यांसारख्या गोष्टी दारामागील हूकला किंवा कपाटातील एखाद्या हुलका अडकडून ठेवा. म्हणजे त्या शोधण्यात वेळ जाणार नाही. इतकेच नाही तर कंबरेला लावाचा पट्टा, स्कार्फ यांसारख्या गोष्टीही तुम्ही अडकवून ठेऊ शकता. हल्ली बाहेर पडताना आपल्या सगळ्यांनाच मास्क घालावे लागते. यातही तुम्हाला मॅचिंग किंवा वेगवेगळे मास्क वापरायची आवड असेल तर हे मास्कही घड्या करुन कपाटात वगैरे ठेवण्यापेक्षा कपाटाच्या आतल्या बाजूला जिथे अडकवण्यासाठी जागा आहे अशाठिकाणी मास्क ठेवा. त्यामुळे बाहेर निघताना ते पटकन सापडण्यास मदत होईल. याबरोबरच पँट, थंडीसाठीचे जर्कीन, टोप्या यांसारख्या वस्तूही तुम्ही भिंतीला एखाद्या हूकला किंवा हँगरना अडकवून ठेवू शकता जे ठेवायला फारसा वेळही लागत नाही आणि सापडतेही पटकन.
२. लहान वस्तू एकत्र ठेवण्यासाठी एखादा ट्रे किंवा बास्केट ठेवा
आपल्याला सतत हाताशी लागतात अशा काही वस्तू असतात. या वस्तूंसाठी एक बास्केट किंवा छानसा डिझायनर ट्रे वेगळा ठेवा. यामध्ये आपण बाहेरुन आल्यावर मोबाईल, घड्याळ, वॉलेट, किल्ली अशा आपल्याला सारख्या लागणाऱ्या वस्तू ठेऊ शकतो. तसेच यामध्ये आपल्याला केसाला लावायचा बो, एखादी क्लिप, एखादी गोष्ट बांधण्यासाठी लागणारे रबरबँड यांसारख्या लहान वस्तू ठेवता येतात. या गोष्टी हाताशी असतील की ऐनवेळी शोधाशोध होत नाही. मात्र हा ट्रे किंवा बास्केट ठराविक कालावधीने साफ करण्याची तयारी ठेवा. नाहीतर त्यामध्ये वस्तू साठत जातील आणि तिथे एक वेगळा पसारा होईल.
३. स्टोरेज असलेले फर्निचर वापरा
आपल्या घरात नेहमी वापराची अंथरुणे, जास्तीची अंथरुणे- पांघरुणे, जास्तीच्या पिशव्या, नको असलेले कपडे, पावसाळी-थंडीचे कपडे किंवा घरात नियमित न लागणाऱ्या असंख्य वस्तू असतात. या वस्तू ठेवण्यासाठी चांगल्या पद्धतीचे स्टोरेज आवश्यक असते. आपण वापरत असलेला बेड. सोफासेट, कपाटे किंवा घरातील इतर फर्निचर हे या गोष्टी ठेवण्यासाठी उपयोगी येईल असे पाहा. फर्निचर दिसण्यासाठी चांगले असायलाच हवे पण ते स्टोरेजसाठीही उपयोगी येईल याचा विचार प्रामुख्याने करा. त्यामुळे तुमचा पसारा वर न दिसता तो आतमध्ये व्यवस्थित राहील.
४. कागदाचा कमीत कमी वापर करा
आपल्या घरात अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींची बिले, पत्रे, लग्नपत्रिका अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. याशिवाय वृत्तपत्रे किंवा अन्यही काही कागदाशी निगडीत गोष्टी असतात. कागदाचा कमीत कमी वापर करुन जास्तीत जास्त गोष्टी डिजिटली करण्याचा प्रयत्न करा. हल्ली डिजिटल युग असल्याने आपण यातील बहुतांश गोष्टी ऑनलाईन करु शकतो. त्यामुळे घरातील कचरा कमी होण्यासही मदत होईल. त्यामुळे या गोष्टीचा आवर्जून विचार करा.
५. एकावेळी एकच कोपरा किंवा खोली आवरा
आपल्याला एकावेळी सगळे आवरायची सवय असते. त्यामुळे एकतर आपले पूर्ण आवरुन होत नाही किंवा एकदाच सगळे केल्याने आपण खूप थकतो. याचा परिणाम आपल्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर होतो. मात्र असे न करता एकावेळी घरातील एकच कोपरा किंवा एक खोली आवरायचे ठरवा. त्यामुळे आपले काम तर सोपे होईलच पण आपल्याला खूप थकायलाही होणार नाही. एक कोपरा घेतला तर त्याच ठिकाणच्या सगळ्या वस्तू कशा नीटनेटक्या ठेवता येतील याचा विचार करा आणि त्यादृष्टीने आवरा.