Join us  

गॅस बर्नर काळेकुट्ट घाणेरडे झालेत? घ्या इनो-लिंबू-व्हिनेगरचा फॉर्म्युला, बर्नर होतील चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2022 6:29 PM

गॅस बर्नरच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात; घरातील इनो, लिंबू, व्हिनेगर यांच्या मदतीनं काही मिनिटात गॅसचे बर्नर होतात चकाचक!

ठळक मुद्देइनोच्या सहाय्यानं 15 मिनीटात गॅस बर्नर स्वच्छ करता येतात. लिंबानं तांब्या पितळाच्या भांड्याप्रमाणे बर्नरही लख्खं करता येतात. 

स्वयंपाकघरातील साफसफाई म्हणजे केवल फरशी आणि टाइल्स चमकवणं किंवा भांडी चकाचक ठेवणं  एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. स्वयंपाकघरात  मिक्सर, फ्रिज, ओव्हन, गॅस अशी विविध साधनसामुग्री आपण वापरत असतो, त्यांची स्वच्छताही तितकीच महत्वाची आहे. गॅस स्वच्छ ठेवणं म्हणजे केवळ गॅस पुसणं नव्हे. गॅसची बर्नरही स्वच्छ ठेवायला हवीत. पण गॅस बर्नरच्या स्वच्छतेकडे हमखास् दुर्लक्ष होतं. ती काळी पडतात. बर्नरच्या छिद्रात कचरा अडकून बर्नरची आच कमी होते. यामुळे गॅस लिक झाल्यासारखा वास येतो, गॅस बर्नर अस्वच्छतेमुळे पूर्ण क्षमतेने काम करु शकत नाहीत. त्यामुळे गॅसही वाया जातो. गॅस बर्नरच्या स्वच्छतेची वेळच्या वेळी काळजी घेतल्यास पैसे मोजून बर्नर साफ करुन घेण्याची गरज पडणार नाही.  घरातील इनो, लिंबू, व्हिनेगर यांच्या मदतीनं काही मिनिटात गॅसचे बर्नर चकाचक करता येतात. 

Image: Google

गॅसची बर्नर स्वच्छ करण्यासाठी

1. इनोच्या द्वारे गॅसची बर्नर स्वच्छ करण्यासाठी अर्धा वाटी पाणी, अर्धा चमचा लिंबाचा रस, 1 इनोचं पाऊच, 1 छोटा चमचा लिक्विड डिटर्जंट आणि एक जुना ब्रश घ्यावा.  सर्वात आधी पाणी गरम करुन घ्यावं. पाण्यात लिंबाचा रस आणि इनो घालावा. यात 15 मिनिटं बर्नर बुडवून ठेवावेत.  नंतर  बर्नवर काही घाण राहिल्यास इनोच्या पाण्यात ब्रश बुडवून ब्रशनं बर्नर घासून घ्यावेत. नंतर कपड्याने पुसून घेतले की बर्नर स्वच्छ होतात.

Image: Google

2.  लिंबानं तांब्या पितळाची भांडी जशी लख्खं होतात तसेच गॅसचे बर्नरही स्वच्छ करता येतात.  यासाठी एक मोठ्या आकाराचा लिंबू , 1 छोटा चमचा मीठ घ्यावं. रात्री झोपण्यापूर्वी  एका वाटीत गरम पाणी करावं. त्यात लिंबाचा रस घालावा. या पाण्यात बर्नर बुडवून ठेवावे. दुसऱ्या दिवशी लिंबाचं साल मिठात घालून त्याने बर्नर रगडून घासले की बर्नर स्वच्छ होतात. 

Image: Google

3. व्हिनेगरच्या मदतीनं गॅसचे बर्नर स्वच्छ करण्यासाठी एक अर्धी वाटी व्हिनेगर घ्यावं. त्यात 1 चमचा बेकिंग सोडा घालावा. या मिश्रणात रात्रभर बर्नर बुडवून ठेवावेत. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत बर्नरमध्ये अडकलेली घाण फुगून् वर येते.  ही घाण टूथब्रशनं घासून स्वच्छ करता येते. 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सकिचन टिप्स