Join us  

ऐकावे ते नवलच, बिल गेट्सही शिकले अवघड वाटणारा 'हा' भारतीय पदार्थ, आवडीने केला फस्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2023 7:41 PM

Bill Gates Makes Roti With Chef Eitan Bernath, Enjoys It With Ghee : बिल गेट्स यांचा हा व्हिडोओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

“बिल गेट्स” यांना जगात आज सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाते. असे कोणी नाही जो त्यांना ओळखत नसेल. बिल गेट्स हे अत्यंत मेहनती आणि परिश्रम घेणारे आहेत. त्यांनी आयुष्यात अनेक संकटांचा सामना करून मायक्रोसॉफ्ट नावाची एक सॉफ्टवेअर कंपनी उभी केली. बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. सध्या मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ते पोळ्या लाटताना व त्यावर तूप लावून खाताना दिसून येत आहेत. त्यांच्यासोबत अमेरिकन शेफ एटन बर्नथही आहेत. शेफ एटन बर्नथ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ते बिल गेट्स यांना पोळ्या बनवण्याचे प्रशिक्षण देत आहेत. तसेच शेफ एटन बर्नथ या पोळ्या कुठे व कसे शिकलो हे बिल गेट्स यांना समजावून सांगत आहेत(Bill Gates Makes Roti With Chef Eitan Bernath, Enjoys It With Ghee).

नक्की काय आहे या व्हिडिओत... 

या व्हिडीओच्या सुरुवातीला, शेफ एटन बर्नथ श्रीमंत उद्योगपती बिल गेट्स यांची ओळख करवून देताना दिसून येत आहेत. त्यानंतर ते गेट्स यांना नवी डिश म्हणजेच चक्क आपल्या भारतीय पोळ्यांची माहिती देतात. त्यानंतर गेट्स चमच्याने पीठ मळून पोळ्या लाटताना दिसून येतात. पोळ्या लाटताना सुप्रसिद्ध अमेरिकन शेफ एटन बर्नथ यांनी एक पोळी गोल कशी लाटतात हे बिल गेट्स यांना शिकवले. त्यानंतर बिल गेट्स यांनीसुद्धा गोल पोळी लाटण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.

 

व्हिडिओत शेफ एटन बर्नथ सांगतात की, त्यांनी आपल्या भारत दौऱ्यात बिहारमध्ये पोळ्या बनवण्याचे तंत्र शिकले. ते म्हणाले - मी भारताच्या बिहारमध्ये गव्हाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटलो होतो. त्या शेतकऱ्यांनी मला गहू पेरणीचे तंत्रज्ञान शिकविले. तिथे मी 'दीदी की रसोई' कँटीनमध्ये काम करणाऱ्या काही महिलांकडून पोळ्या बनवणे शिकलो. या व्हिडीओच्या शेवटी अमेरिकन शेफ एटन बर्नथ आणि श्रीमंत उद्योगपती बिल गेट्स हे दोघेही तूप लावलेली पोळी खाऊन त्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. 

कॅप्शनमध्ये शेफ एटन बर्नथ म्हणतो... 

मी आणि बिल गेट्स यांनी मिळून भारतीय पोळी बनवण्याचा एक आगळा - वेगळा प्रयत्न केला आहे. मी नुकतेच भारतातील बिहारमध्ये जाऊन तेथील गव्हाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटलो. तिथे मी 'दीदी की रसोई' कँटीनमध्ये काम करणाऱ्या काही महिलांकडून पोळ्या बनवणे शिकलो. या सर्वांना माझे खूप खूप धान्यवाद... !!

 नेटकरी काय म्हणत आहेत... 

बिल गेट्स यांचा हा व्हिडोओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकजण हा व्हिडिओ शेअर करत आहेत. एका यूजरने कमेंट केली- लव्ह फ्रॉम इंडिया. आणखी एका युजरने गंमतीने लिहिले - मी यापेक्षा चांगल्या रोट्या बनवतो. मला कामाला ठेवा. दुसर्‍या यूजरने लिहिले - ते चांगले दिसत आहे. अन्य एका यूजरने गंमतीत लिहिले - हा व्हिडिओ चांगला आहे. पण त्यात रोटी कशी बनवू नये हे सांगण्यात आले आहे. अशा संमिश्र प्रतिक्रिया देत तब्बल ९०.५ लाख नेटकऱ्यांनी आतापर्यंत हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. २,०६३ इतके लाईक्स आणि २२८ नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे.

टॅग्स :सोशल व्हायरल